चीनची पाकला दोन अणुभट्ट्यांची भेट ; भारताचा विरोध

नवी दिल्ली – चीन आणि पाकिस्तानमध्ये आता आणखी एक अणू करार होणार असून या करारांतर्गत चीन पाकला दोन अणूभट्ट्या देणार असल्याचे वृत्त आहे. या कराराला भारताने कडाडून विरोध दर्शवला असून हा प्रश्न भारताने जगातील विविध देशांचा समावेश असलेल्या अणुइंधन पुरवठादार गटाकडे मांडण्याचा निर्णय घेतला आहे.

कराचीजवळ पाकिस्तानने अणूभट्टीकेंद्र उभारले असून या केंद्रासाठी चीनने पाकला मदतीचा हात दिला आहे. चीन या केंद्रात दोन अ‍ॅटॉमिक रिएक्टर बसवणार आहे. या प्रकल्पाची किंमत सुमारे नऊ अब्ज डॉलर्स आहे. पाकिस्तानमधील सद्यस्थिती पाहता पाकिस्तानची अणूसज्जता भारतासाठी डोकेदुखी असून त्यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भारताने या कराराला विरोध दर्शवला आहे.

चीनने पाकशी करार करुन आंतरराष्ट्रीय अण्वस्त्रविरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याचे भारताचे म्हणणे आहे. भारताने यापूर्वीही पाकिस्तानला अणूतंत्रज्ञान देण्यास चीनला विरोध दर्शवला होता. मात्र या विरोधाला न जुमानता चीनने पाकिस्तानला अण्वस्त्रसज्ज करण्याचे धोरण कायम ठेवले आहे.