
मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची 200 वी टेस्ट घरच्या मैदानात म्हणजे वानखेडेवरच होणार आहे. बीसीसीआयच्या बैठकीत आज यावर शिक्कामोर्तब झाले. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघ पुढील महिन्यात भारतात येणार आहे. या मालिकेनंतर सचिन क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्त होणार असून या मालिकेव्दारे सचिन कसोटी सामन्यांचे व्दिशतक पूर्ण करणार आहे. यातील पहिला सामना 6 ते 10 नोव्हेंबर व दुसरा म्हणजेच 200 वा कसोटी सामना 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.
आपली अखेरची कसोटी ही मुंबईत व्हावी, अशी इच्छा सचिन तेंडुलकरने बीसीसीआयला दिलेल्या पत्रात व्यक्त केली होती. तसेच सचिन तेंडुलकरच्या आईनेही शेवटचा कसोटी सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहायचा असल्याने हा सामना मुंबईत घ्यावा, असे म्हटले होते. वेस्ट इंडिज दौर्यासंदर्भात मंगळवारी बीसीसीआयची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सचिन विनंतीला मान देत बीसीसीआयने 14 नोव्हेंबर रोजी सुरु होणारी 200 वी कसोटी ुंबईतील वानखेडे स्टेडियमवर घेण्याचा निर्णय घेतला. तर त्याआधी 6 नोव्हेंबर रोजी होणारा कसोटी सामना कोलकात्यातील ईडन गार्डन स्टेडियमवर होणार आहे. विश्वचषक जिंकण्याचे सचिनचे स्वप्न पूर्ण व्हायला 22 वर्षांचा कालावधी लागला. सचिनचे हे स्वप्न त्याच्या घरच्याच मैदानावर पूर्ण झाले. हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी सचिनचा विश्वास होता तो स्वत:च्या कौशल्यावर आणि मेहनतीवर.
वयाच्या 11 व्या वर्षी सचिनने आचरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटची बाराखडी गिरवायला सुरुवात केली, आणि अवघ्या 5 वर्षांनी त्याने भारतीय संघात स्थान पटकावले. बरोबर 24 वर्षांपूर्वी 15 नोव्हेंबर 1989 ला सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेही पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध कराचीच्या मैदानात. त्यावेळी सचिनचे वय होते फक्त 16 वर्ष. त्या वयात मनात आले तरी सचिनला आपल्या घरच्या मैदानात पदार्पण करणे शक्य नव्हते. पण आता क्रिकेटला निरोप देताना मात्र सचिनने निवड केलीये ती घरच्या मैदानाची. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमची. बीसीसीआय आणि एमसीएने ही अवघ्या काही तासांत सचिनच्या इच्छेवर शिक्कामोर्तब केल आहे. सचिनची ही विक्रमी 200 वी आणि अखेरची कसोटी वानखेडे स्टेडियमवरच होणार आहे.