टीम इंडिया आज विजयासाठी प्रयत्नशील

जयपूर – टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यादत विजय टीम इंडिया आसुसलेली आहे. पहिला सामना जिंकल्याने आगामी काळात ऑस्ट्रेलियाचा संघ विजयात सातत्य राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. दोन्ही संघांचा विचार केला की, कागदावर ऑस्ट्रेलियापेक्षा भारताचा संघ नक्कीच वरचढ आहे. पण पहिला सामना जिंकल्याने ऑस्ट्रेलियाचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल. पण भारताने जर लौकिकाला साजेशी कामगिरी केली तर विजय मिळवीणे अवघड नाही. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात सूर हरपलेली गोलंदाजी आणि अयशस्वी फलंदाजीमुळे टीम इंडियाची निराशा झाली. गोलंदाजीमध्ये आर. अश्विन आणि युवराज सिंग यांचा अपवाद वगळता अन्य गोलंदाजांना भेदक मारा करता आला नाही. भुवनेश्वर कुमार, विनय कुमार आणि इशांत शर्मा यांच्या गोलंदाजीचा ऑस्ट्रेलियाने चांगलाच समाचार घेतला होता. फलंदाजीमध्ये रोहित शर्माने चांगली सुरुवात केली असली तरी त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. विराट कोहलीच्या बाबतीतही असेच घडले.

ऑस्ट्रेलियाने मालिकेची सुरुवात चांगली केली. जॉर्ज बेलीने कर्णधाराला साजेशी खेळी साकारत संघाला विजयाचा पाया रचून दिला. बेलीपेक्षा सलामीवीर अॅनरोन फिन्चचे कौतुक करायला हवे, कारण त्याने सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजीवर प्रहार केला आणि त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला धावांची गती वाढवून तीनशे धावांचा टप्पा गाठता आला. गोलंदाजीमध्ये जेम्स फॉल्कनर हे ऑस्ट्रेलियाचे अस्त्र असून तो आतापर्यंत सातत्याने विकेट्स मिळवत आला आहे. त्याचबरोबर मिचेल जॉन्सन आणि शेन वॉटसन यांच्याकडे गोलंदाजीचा चांगला अनुभव आहे.

Leave a Comment