खोल समुद्रात पसरणार इंटरनेटचे मायाजाल

वॉशिग्टन – खोल समुद्रात इंटरनेटचे मायाजाल उभे करण्यासाठीच्या यंत्रणेचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले असून सेन्सरच्या मदतीने हे इंटरनेट नेटवर्क अतिशय प्रभावीपणे काम करू शकणार आहे. खोल समुद्राच्या तळाशी इंटरनेट कार्यरत केल्यामुळे त्सुनामी, सम्रुदातील वाढते प्रदूषण यांची माहिती जशी त्वरीत मिळणार आहे तसेच समुद्राची निरीक्षणे करणेही सहज साध्य होऊ शकणार आहे.

टोमासो मेलोडिया या बफेलो विद्यापीठातील संशोधकाच्या नेतृत्त्वाखाली काम करत असलेल्या संशोधकांच्या गटाने हे संशोधन तडीस नेले आहे. विशेष म्हणजे समुद्र तळाशी होत असलेले बदल वा त्सुनामी व तत्सम अन्य माहिती कुणालाही स्मार्टफोन, लॅपटॉप अथवा संगणकावरही उपलब्ध होऊ शकणार आहे. परिणामी आगामी संकटांची चाहूल अगोदरच मिळू शकणार आहे.

मेलिडिया म्हणाले की रेडिओ लहरी समुद्राच्या खोल पाण्यात कमजोर पडतात त्यामुळे तळाची माहिती मिळविण्यासाठी साऊंड वेव्हचा वापर केला जातो. आज अनेक देश ही पद्धत वापरतात मात्र त्यात प्रत्येकाची पद्धत वेगळी असल्याने मिळालेली माहिती शेअर केली जात नाही. नव्या सेन्सर इंटरनेट मुळे हा प्रश्न सुटणार आहे. अंडरवॉटर सेन्सर हे वायरलेस आहेत. या प्रयोगाची चाचणी एरि सरोवरत यशस्वी ठरली आहे. त्यासाठी १८ किलेा वजनाचे सेन्सर बसविले गेले होते. मात्र समुद्रातील सेन्सर अधिक कार्यक्षम असतील आणि त्यावर संकटांप्रमाणेच समुद्रात प्रदूषण वाढ होत असेल तर त्याचीही माहिती मिळेल. इतकेच नव्हे तर लष्करी कामासाठीही या नेटचा उपयोग होऊ शकेल.