मुंबई – वादग्रस्त आदर्श सोसायटी घोटाळाप्रकरणी वादाच्या भोवर्यात अडकलेल्या केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या पाठोपाठ राज्याचे ग्राम विकास मंत्री जयंत पाटील यांनाही केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) क्लिन चिट दिली आहे. जयंत पाटील यांच्या विरोधात आरोप सिद्ध करणारा एकही पुरावाच नसल्याचे प्रतिज्ञापत्र सीबीआयचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक के. बाबू यांनी उच्च न्यायालयात सादर केले. त्यामुळे जयंत पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या वादग्रस्त आदर्श सोसायटीत केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे आणि राज्याचे ग्राम विकास मंत्री जयंत पाटील यांचे बेनाती फ्लॅट्स असल्याचा आरोप करून त्यांना आरोपी करा, अशी विनंती करणारा अर्ज सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी उच्च न्यायालयात केला होता. या दोघांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश द्या, अशी विंनती केली होती. यापूर्वी सीबीआयने केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या विरोधात आरोप सिद्ध होणारे पुरावे नसल्याचे स्पष्ट करत त्यांना क्लिनचिट दिली होती. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कोणताही गैरवापर केल्याचा कोणताही पुरावा नाही, असे स्पष्ट केले होते. त्यांनतर वाटेगावकर यांनी शिंदे आणि पाटील यांचे दोषत्व सिद्ध करणारे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्याला उत्तर देताना सीबीआयने दोघांनाही क्लिन चिट दिली.