मुंबई – महायुतीत प्रत्यक्षरित्या सामील न होताही मनसे भाजप कोट्यातील तीन जागांवर तर सेनेच्या कोट्यातील एका जागेवर अशा चार जागांवर लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भाजप पुणे , मुंबई आणि भिवंडीच्या जागा मनसेसाठी देईल असे समजते. अर्थात या संबंधी झालेल्या चर्चेदरम्यान सेनेने मनसेला एकही जागा सोडणार नाही असे आडमुठे धोरण घेतले होते मात्र भाजपने पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावाची घोषणा केल्यानंतर मोदींच्या आग्रहावरूनच मनसेला अप्रत्यक्ष रित्या युतीत घेण्याचे व त्यांच्यासाठी जागा सोडण्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे वरीष्ठ भाजप नेत्यानी सांगितले.
नुकत्याच पार पडलेल्या सेनेच्या दसरा रॅलीत शिवसनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज यांच्याविरोधात एक शब्दही उच्चारला नव्हता तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरे पार्क भूमीपूजन समारंभात सेना विरोधात कोणतीही कॉमेंट केली नव्हती. यावरून दोन्ही पक्षांनी सध्या तरी नरमाईचे धोरण घेतल्याचे स्पष्ट होत असतानाच मोदींच्या शिष्टाईमुळे लोकसभा जागावाटपाची तेढही सुटली असल्याचे सांगितले जात आहे.
२००९ च्या लोकसभा निवडणुकात भाजपने मुंबईतील तीन जागा लढविल्या होत्या. त्यापैकी उत्तरपूर्व मुंबईची जागा मनसेसाठी दिली जाणार आहे कारण त्या निवडणुकीत मनसेने येथे १ लाख मतांचा टप्पा पार केला होता.अन्य दोन जागांत पुणे आणि भिवंडी या जागा आहेत. सेनेच्या वाट्यातील मुंबई अथवा कल्याणची जागा मनसेला दिली जाईल असा अंदाज आहे मात्र मनसे दक्षिण मुंबईची आमदार बाळा नांदगांवकर यांची जागा मागेल असे सांगितले जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मात्र जागा वाटपाबाबत आपल्याला कांहीही माहिती मिळालेली नाही असे सांगितले आहे.