चेंगराचेंगरी प्रकरणी चौघे अधिकारी निलंबित

दातिया – मध्य प्रदेशाच्या दातिया जिल्ह्यातील रतनगढ येथे देवीच्या यात्रेच्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकाराची जबाबदारी टाकून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यासह चौघा वरिष्ठ शासकीय अधिकार्‍यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, या चेंगराचेंगरीत मरण पावणार्‍यांची संख्या ११५ वर गेली आहे. सध्या मध्य प्रदेशात निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे राज्य शासनाला हे निलंबनाचे आदेश देता आले नाहीत. त्याऐवजी निवडणूक आयुक्तांनी हे आदेश काढले.

जिल्हाधिकारी संकेत भुंडवे, पोलीस अधीक्षक सी.एस. सोळंकी, उपजिल्हाधिकारी महिप तेजस्वी आणि पोलीस उपअधीक्षक बी.एन. वसाबे यांना निलंबित करण्यात आले आहे. रतनगढची ही यात्रा ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत होती त्या सेवदा पोलीस ठाण्यातील सगळ्या कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या प्रकाराची चौकशी करण्यासाठी चौकशी आयोग नेमला आहे. या चौकशीचा अहवाल १५ दिवसांच्या आत सादर होईल असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी जाण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र निवडणूक आयोगाने त्यांना तशी परवानगी दिली नाही. परंतु त्यांनी दातिया येथील रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तेव्हा जखमींच्या नातेवाईकांनी त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. पोलिसांनी काही वाहन चालकांकडून लाच घेऊन त्यांना बंदी असलेल्या जागेवर वाहने उभी करण्याची परवानगी दिली, असाही आरोप या लोकांनी केला.

Leave a Comment