विजया दशमीचे इशारे महोत्सव

शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. याचवेळी राज ठाकरे यांचाही एक मेळावा झाला आणि गोपीनाथ मुंडे यांचा एक मेळावा भगवानगडावर झाला. आता शिवसेनेच्या विश्‍वविक्रमी दसरा मेळाव्यासोबत राज ठाकरे आणि मुंडे यांचेही हे दोन मेळावे गाजत राहणार असे दिसत आहे. या तिन्ही मेळाव्यांत झालेल्या भाषणाचे वृत्तांत वाचले तर असे लक्षात येते की या तिन्हीतही कमालीची नकारात्मक भाषा वापरली गेलेली आहे. गोपीनाथ मुंडे हे ज्या भगवानगडा वरच्या उत्सवात सहभागी होतात तो महोत्सव धामिर्र्क असतो पण त्यात मुंडे नेहमी आक्रमक राजकीय भाषण ठोकत असतात. तिथे त्यांना राजकीय भाष्य करण्याचा मोह टाळता येत नाही. खरे तर अशा महोत्सवात नेत्यांना सांस्कृतिक विषयावर बोलून आपल्या व्यक्तिमत्त्वाची एक आगळी वेगळी बाजू लोकांसमोर ठेवता येत असते पण तो मोका दवडून हे लोक तिथेही राजकीय भाषण देतात. मुंडे यांना तर आता अजित पवार हा एकच विषय समोर दिसतो आहे की काय असे वाटायला लागले आहे. त्यांनी भगवानगडा वरही अजित पवारांनाच इशारे दिले. आपण आपल्या भाषणात निष्कारण एकाच माणसाचा उल्लेख करीत असतो तेव्हा त्यालाच प्रसिद्धी मिळत असते आणि नकळतपणे तोच मोठा होत असतो याचे भान मुंडे यांनाही राहू नये याचे आश्‍चर्य वाटते.

कॉंग्रेसच्या नेत्यांनी विरोधासाठी का होईना पण सातत्याने मोदी नावाचा जप सुरू केला आहे. आपण मोदी यांच्यावर टीका केली तर त्यांचे महत्त्व कमी होईल असे या कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटते पण स्थिती उलट आहे. ते जितका मोदी यांचा वारंंवार उल्लेख करतील तेवढे मोदी लोकप्रिय होत आहेत. कॉंग्रेसच्या नेत्यांना हे शास्त्र माहीत नाही पण मुंडे यांना तर माहीत आहे ना ? मग त्यांना अजित पवार या नावाचा उच्चार न करण्याइतपत संयम का रहात नाही ? मुंडे भगवानगडावर पवार यांच्या नावाने खडे फोडत होते तेव्हा तिकडे पवार काय करीत होते ? ते मुंडे यांचा हा हल्ला बोथट करण्याचा यशस्वी डाव टाकत होते. फार न बोलता ते हे करीत होते. मुंडे यांचे भाजपातले अंंतर्गत शत्रू नितीन गडकरी यांच्या स्फूर्ती उद्योग समूहाच्या एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. गडकरी आणि पवार एका व्यासपीठावर होते. मुंडे इकडे पवारांना बरबाद करण्याच्या शपथा घेत होते तर तिकडे हेच पवार भाजपाच्याच कार्यक्रमात सहभागी होऊन सत्काराचा स्वीकार करीत होते. मुंडे पवारांना शिव्याशाप देत होते तर भाजपाचे नेते गडकरी हे पवारांचा सत्कार करीत होते. पवार एवढेच करून थांबले नाहीत.

या कार्यक्रमात बोलताना पवारांनी भाजपाला अस्पृश्य का समजायचे, असा सवाल करीत होते आणि कदाचित गरज पडली तर ते भाजपाच्या हातात हात घालतील असेही सूचित करीत होते. तिकडे शिवसेनेचे नेतेही पवारांना टीकेचे लक्ष्य करीत होते. त्यांनी कितीही अजागळ भाषेत पवारांवर टीका केली तरी पवार त्यांना उत्तर देत नाहीत. उलट अशी एखादीच चाल खेळतात की त्यांच्या शिव्यांचा भडीमार आणि लाखोली निष्प्रभ व्हावी. गडकरी यांचा सत्कार स्वीकारून त्या सत्कार समारंभातच भाजपाला जवळ करण्याचे सुचवून ते शिवसेनेलाही खिजवत होते. उद्धव ठाकरे यांनी कितीही तोंडची वाफ दवडली तरीही पवारांची ही एक खेळी त्यांच्या तोफांना बोथट करणारी ठरत होती. पवारांच्या अजून एका खेळीने शिवसेनेला फजित केले आहे. शिवसेनेचे नेते ज्या मनोहर जोशी यांना आपल्या मेळाव्यातून हाकलून देतात त्या जोशींना पवार मात्र जवळ करतात. त्यांना भेटतात आणि ते कितीही अपमानास्पद वागणूक दिली तरीही शिवसेना सोडणार नाहीत अशी ग्वाही देत होते.पवारांची आणि जोशी यांची मैत्री आहे पण त्यापोटी त्यांनी जोशी यांची एवढी तरफदारी करावी याचे कोणालाही आश्‍चर्य वाटेल पण या तरफदारीत काही तरी पेच आहे हे नक्कीच.

मनोहर जोेशींना दसरा मेळाव्यातून बाहेर पडण्यास भाग पाडले गेले पण त्या संबंधात शिवसेनेच्या एकाही नेत्याने साधी हळहळही व्यक्त केली नाही. त्यांना सर नको आहेत हे खरे आहे. जोशी यांनीही निवृत्त व्हावे असे आमचेही मत आहे पण जोशी पवारांचे मित्र आहेत हे विसरता येत नाही. कदाचित ही सारी खेळी जाणून बुजून खेळली जात असेल. मनोहर जोशी यांचा अपमान होणार हे माहीत असतानाही त्यांनी मेळाव्याला जावे म्हणजे मेळाव्यातला अपमान हे निमित्त करून पंतांना राष्ट्रवादीतही प्रवेश करण्यास एक बहाणा मिळेल.राजकारणात आपण समजतो तसे दोन आणि दोन चार होत नाहीत. मनोहर जोशी किंवा शरद पवार असे नेते बोलतील ते खरे नसते. मनोहर जोशी राष्ट्रवादीत आले तर राष्ट्रवादीला हवेच आहे कारण त्यामुळे शिवसेना ऐन निवडणुकीच्या तोेंडावर फुटली तर त्या फुटीचा फायदा पवारांंना मिळेल. या संबंधात जे काही घडणार आहे ते एक दोन आठवड्यात घडेल. गोष्टी सरळ सरळ दिसतात तशा नसतात. एका बाजूला मनोहर जोशींच्या रूपाने शिवसेनेत आणि गडकरीच्या रूपाने भाजपात मतभेद निर्माण झाले की पवारांना अजून काय हवे आहे ?