कोळसा घोटाळ्याप्रकरणी बिर्लाविरूदध गुन्हा

दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कोळसा घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांच्यावर मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने या संदर्भात हैद्राबाद, कोलकता आणि मुंबई येथील कार्यालयांमध्ये छापे टाकले आहेत. कोळसा घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल होण्यास सुरूवात झाल्याने आणखी कोणांवर गुन्हा दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणताही लिलाव न करता मनमानी पद्धतीने केंद्र सरकारने कोळसा खाणींचे वाटप केल्याने सरकारला तब्बल १.८६ लाख कोटींचा तोटा झाल्याचा ठपका कॅगने ऑगस्ट २०१२ रोजी प्रकाशीत केलेल्या अहवालात केला होता. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असून आतापर्यंत या घोटाळ्यात विविध ख्यातनाम उद्योगपती व सरकारी अधिकारी यांच्यावर एकूण १० गुन्हे दाखल आहेत.

सीबीआयच्यावतीने मंगळवारी कुमार मंगलम बिर्ला यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीचा या घोटाळ्यात समावेश असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. बिर्लांसह कोळसा विभागाचे माजी सचिव पी. सी. पारिख यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आता गुन्हे दाखल होत असल्याने मोठमोठया नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.