हसण्यासाठी जन्म आपुला

आपल्या आरोग्यावर हसण्याचे किती चांगले परिणाम होतात हे आता सर्वांना माहीत झालेले आहे आणि त्यामुळे वर्षातून एक दिवस हास्य दिनही पाळला जातो. परंतु हसण्याचे आपल्या शरीरावर होणारे परिणाम खरोखरच अनुभवायचे असतील तर दररोज किमान १५ ते २० मिनिटे मनसोक्तपणे हसले पाहिजेत. याबाबतीत हास्य क्लबांना मर्यादा असतात. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की, हसण्यासाठी विनोद व्हावा लागतो. एखादे विनोदी नाटक बघणे, टी.व्ही.वरची एखादी विनोदी मालिका बघणे किंवा विनोदी चुटके ऐकणे यातून हसू येते. मात्र त्यामध्ये एक अडचण असते ती म्हणजे काही लोकांना विनोद बुद्धीच नसते. अशा लोकांनी कितीही विनोदी नाटक पाहिले तरी त्यांच्या चेहर्‍यावर एखादीही स्मित रेषा उमटत नाही. त्यांच्यात हा दोषच असतो.

ज्या माणसाला विनोद बुद्धी नसते तो अगदीच बिनकामाचा असतो असे म्हणता येणार नाही. कारण विनोद बुद्धी हा आपल्या बुद्धीचा आणि चिंतन करण्याच्या पद्धतीचा परिणाम असतो. बालपणामध्ये मेंदूची वाढ होताना ती एका विशिष्ट पद्धतीने झाली की, विनोद बुद्धी वाढते. मात्र ती तशी झाली नाही की मात्र त्या माणसाकडे विनोद बुद्धी नसते. परिणामी अशा लोकांच्या आयुष्यामध्ये विनोद घडले तरी त्यांना हसूच येत नाही. खरे म्हणजे आपल्या दिवसभराच्या दिनचर्येमध्ये असे प्रसंग हरघडी घडत असतात की ज्यामुळे आपल्याला हसू येत असते. असे असले तरी दिवसभरात १५-२० मिनिटे सलग हसायला मिळणे हे दुरापास्तच. त्यातच पुन्हा विनोद बुद्धी नसल्यास आनंदी आनंद. यावर उपाय म्हणून काही लोकांनी हास्य योग नावाचा एक नवा प्रकार विकसित केला आहे.

त्यांनी हसण्याचा गांभीर्याने अभ्यास केला. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की, हसताना स्नायूच्या विशेषत: पोटातल्या स्नायूच्या काही विशिष्ट हालचाली होतात. तेव्हा न हसता सुद्धा त्या विशिष्ट हालचाली जाणीवपूर्वक केल्या तर हसण्यामुळे होणारे आरोग्याचे ङ्गायदे या हालचालीमुळे आपोआप होऊ शकतील. मग या लोकांनी या हालचाली कशा होतील, यावर लक्ष केंद्रित केले आणि प्राणायामाच्या काही विशिष्ट प्रकारांनी या हालचाली होऊ शकतात हे त्यांच्या लक्षात आले. आपण रोज व्यायाम करतो, तसाच या हालचालींचा व्यायाम केला की, अनेक रोग आपल्यापासून दूर जाऊ शकतात. या हसण्यामध्ये विनोद न होता हसणे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment