श्रीमंत चिन्यांसाठी ब्रिटनच्या व्हिसाचे नियम शिथिल

लंडन – देशात अब्जावधी पौंडांची गुंतवणूक व्हावी यासाठी ब्रिटनने श्रीमंत चीनी उद्योजक, व्यावसायिक व पर्यटक यांच्यासाठी फास्ट ट्रॅक व्हिसा देण्याची घोषणा केली आहे. चीनच्या दौर्‍यावर आलेले ब्रिटनचे चॅन्सलर जॉर्ज ऑसबॉर्न तसेच त्याचवेळी चीनमध्ये आलेले लंडनचे महापौर बोरिस जॉन्सन यच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी गतवर्षी तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांची भेट घेतल्याने चीन व ब्रिटनमधील संबंधात तणाव निर्माण झाला होता तो या घोषनेने निवळण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

चीनमधील गुंतवणूकदार व उद्योजकांनी मँचेस्टर विमामतळासाठी ८०० दशलक्ष पौंडांची गुंतवणूक केली आहे. सध्याच्या चीनी लोकांचा कल पाहता त्यांची ब्रिटनमधील गुंतवणूक अब्जावधी पौंडावर जाईल असे संकेत मिळत आहेत. गेल्या वर्षीच ब्रिटनच्या गृहसचिव थेरेसा मे यांनी व्हीसा नियम शिथिल करण्याने राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होण्याचा इशारा दिला होता मात्र ऑसबॉन यांनी हा इशारा कानाआड करून चीनी लोकांसाठी फास्ट ट्रॅक व्हीसा देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार निवडक चीनी नागरिकांना चोवीस तासात सुपर प्रायोरिटी खाली व्हीसा दिला जाणार असून पुढील वर्षापासून या कामासाठी केवळ पाच मिनिटांचाच अवधी लागणार आहे असे समजते. युरोपियन युनियनच्या भेटीवर येणार्याअ चीनी लोकांना ब्रिटनसाठी स्वतंत्र व्हिसा घ्यावा लागत होता तो आता घ्यावा लागणार नाही.

देशात गुंतवणूक वाढावी यासाठी चीनच्या मानवी हक्क संरक्षणाचा आंतरराष्ट्रीय प्रश्न अथवा तिबेट संबंधातही ऑसबॉन यांनी चीन भेटीत वक्तव्य करण्याचे टाळले आहे. त्यांच्या चीन व्हिसा घोषणेवर ब्रिटनमधील उद्योजकांनीही आनंद व्यक्त केला आहे.गेल्या वर्षात २,१०,००० चीनी नागरिकांना ब्रिटनचा व्हिसा दिला गेला होता व त्यातून ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला सुमारे ३०० दशलक्ष पौंडांची चालना मिळाली होती असेही समजते.

Leave a Comment