ब्रिटनमध्ये लहान मुलांमधील स्थूलपणाची गंभीर समस्या

लंडन – ब्रिटनमध्ये १० महिने ते १५ वर्षे वयोगटातील मुलांत असलेला अतिस्थूलपणा ही मोठी समस्या बनली असून असा अतिस्थूलपणा असलेल्या मुलांची संख्या धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. गेल्या तीन वर्षात या रोगापायी किमान ९३२ मुलांवर रूग्णालयात उपचार करण्याची वेळ आली आहे. त्यात १० महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. ब्रिटन ओबेसिटी एपिडेमिक असे या आजाराचे नामकरण केले गेले आहे. अधिकृत आकडेवारीपेक्षा प्रत्यक्षातील ओबेस मुलांचा आकडा कितीतरी अधिक असावा अशीही भीती व्यक्त केली जात आहे.

नॅशनल ओबेसिटी फोरमचे सदस्य व चाईल्ड ग्रोथ फौंडेशन या चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष टॅम फ्राय यांच्या म्हणण्याप्रमाणे अतिस्थूल असलेल्या मुलांची आकडेवारी हा ब्रिटनसाठी वेक अप कॉल आहे. बदलती जीवनशैली व चुकीचा आहार ही त्यामागची प्रमुख कारणे आहेतच पण लहान मुलांसाठी आहार बनविणाऱ्या अनेक नामवंत कंपन्यांच्या उत्पादनातही साखरेचे प्रमाण नियमापेक्षा कितीतरी अधिक असल्याचे दिसून आले आहे. या रोगापायी सरकारला प्रत्येक वर्षी ४.२ अब्ज पौंड खर्च येत आहे.

सध्याच्या सर्वेक्षणानुसार दोन वर्षांखालील व दहा वर्ष वयोगटातील  तीन मुलांत एक मूल अतिस्थूल किवा ओव्हरवेट आहे. २००० सालात अशा प्रकारच्या ८७२ मुलांवर उपचार केले गेले ती संख्या २००९ मध्ये ३८०६ वर गेली आहे. या शिवाय अतिवजनामुळे दमा, मधुमेह या सारख्या रोगांवर उपचार केल्या गेलेल्या मुलांची संख्या २१ हजारांवर आहे आणि हे सर्व ५ ते १५ वयोगटातील आहेत.

Leave a Comment