जम्मू – पाकिस्तानी सैनिकांनी दहशतवाद्यांच्या मदतीने केरान क्षेत्रात केलेली एका खेड्यातली घुसखोरी संपून आठवडाही उलटला नाही तोच पुन्हा एकदा पाकिस्तानी सैनिकांनी जम्मूतील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या भारासिंगा या चौकीवर तसेच या रेषेजवळच्या मेंढार बटालियनच्या कृष्णा घाटी आणि भिंबेर गली या दोन क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोळीबार आणि तोफांचा मारा सुरू केला आहे. हा सगळा प्रदेश जम्मू भागातील पूंछ जिल्ह्यातला आहे.
नेहमीप्रमाणेच भारतीय सैनिकांनी या हल्ल्याचा प्रतिकार केला. भारतीय बाजूने तरी पाकिस्तानच्या हल्ल्याने जीवितहानी झालेली नाही. २०१३ या एका वर्षामध्ये पाकिस्तानी सैनिकांनी अनेकदा घुसखोरी केली असून यावर्षी ही संख्या १३० झाली आहे. २००३ साली भारत आणि पाकिस्तान या दोन देशात युध्दबंदी झाली परंतु पाकिस्तानने युध्दबंदीचे नियम कधीच पाळले नाहीत. अनेकदा घुसखोरी करून भारतीय जवानांवर गोळीबार केला. ८ वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. २०१३ या वर्षात गेल्या ८ वर्षातील सर्वाधिक वेळा युध्दबंदी ओलांडली गेलेली आहे.
काल पाकिस्तानी जवानांनी संध्याकाळी ६.३० वाजता अचानकपणे भारतीय हद्दीत भडीमार सुरू केला. आजवर बंदुकातून गोळीबार केला जात असे. परंतु कालच्या गोळीबारात तोफा वापरण्यात आल्या. अर्थात, गोळीबार सुरू होताच भारतीय सैनिकांनी त्याचा प्रतिकार केला.