भोपाळ – मध्य प्रदेशाच्या रतनगढ येथील मंदिरात काल झालेल्या चेंगराचेंगरीत मरणार्यांची संख्या १०९ झाली आहे. चेंगराचेंगरी झालेले हे तीर्थक्षेत्र दांतिया जिल्ह्यात असून ते राजधानी भोपाळपासून ३२० किलोमीटर अंतरावर आहे. या तीर्थक्षेत्राजवळून नदी वाहते. त्या नदीवरचा पूल पार करून मंदिरात जावे लागते. त्या पुलावरून जाताना ही चेंगराचेंगरी झाली. काल दुपारपर्यंत पुलावरून ८९ भाविकांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले होते. पण रात्री उशिरा आणखी काही मृतदेह पाण्यात आढळले आणि मृतांची संख्या १०९ असल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
या चेंगराचेंगरीत शंभरापेक्षाही अधिक लोक जखमी झाले असून त्यांच्यावर नजिकच्या जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचे कारण काय आहे याचा अजून नेमका आलेला नाही. परंतु भाविकांचा सारा रोष पोलिसांवर आहे. त्यामुळे काल मदतकार्य करणार्या पोलिसांवरच जमावाने दगडफेक केली. त्यावेळी पोलिसांना लाठीमार करावा लागला त्यातही काही लोक जखमी झाले.
या मंदिराजवळ नवरात्राच्या शेवटच्या दिवशी नवरात्राच्या शेवटच्या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे हा प्रकार घडला. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पाच वर्षापूर्वी अशाच प्रकारची चेंगराचेंगरी झाली होती. त्याशिवाय गतवर्षी मध्य प्रदेशातल्या सलकनपूर येथील देवीच्या मंदिरात असाच प्रकार घडून तीन महिला मृत्यू पावल्या होत्या. तर ३५ जण जखमी झाले होते. सलकनपूर हे तीर्थक्षेत्र मध्य प्रदेशाच्या सिहोर जिल्ह्यात आहे. काल दुर्घटना घडलेले ठिकाण हे नजिकच्या दातिया जिल्ह्यात आहे.