उत्तर प्रदेशातील अन्य राजकीय पक्ष नेते भाजपच्या प्रेमात

लखनौ – पश्चिम उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगरची दंगल म्हणा अथवा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा करिश्मा म्हणा, पण बहुतेक सर्व राजकीय पक्षातील नेते भाजपमध्ये दाखल होण्यास उतावीळ झाले असल्याचे व त्यातील कांही जण आपल्या समर्थकांसह भाजपत यापूर्वीच डेरेदाखल झाले असल्याचे दिसून येत आहे. यामुळे निदान उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात तरी भाजपचे बळ वाढताना दिसत आहे.

भाजपत दाखल होणार्याप आणि होऊ इच्छीणार्या  नेत्यात समाजवादी, बहुजन समाजवादी, राष्ट्रीय लोकदल तसेच काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे असे भाजपतील वरीष्ठ नेत्यांकडून सांगितले जात आहे. गेल्याच आठवड्यात राजदचे नेते चौधरी बाबुलाल यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपत प्रवेश केला असून ते मुलायमसिग यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. जाट समाजाचे असलेले बाबुलाल यांच्यामुळे भाजपकडे जाट समाजाची मते मोठ्या प्रमाणावर वळण्याची शक्यता मिर्माण झाली असून बाबुलाल यांना मथुरा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असल्याचेही वृत्त आहे. मुझफ्फर नगर दंगलीनंतर जाट समाज भाजपकडे वळला आहे.

अन्य नेत्यात माजी खासदार मुन्शीराम पाल ६ आक्टोबरला भाजपत दाखल झाले आहेत तर चार वेळा आमदार असलेल्या आणि बहुजन समाज पक्षाच्या सरकारात मंत्रीपद भूषविलेल्या ओमवती आपल्या पतीसह भाजपात प्रवेश करत आहेत. समाजवादीचे खासदार सोमपाल शास्त्री भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत तर बहुजनचे सदस्य व उत्तर प्रदेश कौन्सिलचे सदस्य राजचंद्रसिंग प्रधान हे ४ आक्टोबरला अमित शहा यांना भेटले आहेत व या भेटीत त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा झाली असल्याचेही सांगितले जात आहे. काँग्रेसचे नेते गंगा बक्श सिंग यांनीही भाजपात प्रवेश केला आहे.

Leave a Comment