वॉशिग्टन – पृथ्वीचा अंत अथवा डूम्स डे संबंधी आत्तापर्यंत अनेक तारखा जाहीर झाल्या आणि त्या उलटूनही गेल्या आहेत. मात्र नासातील संशोधकांनी व्यक्त केलेल्या नव्या अंदाजानुसार पृथ्वीचा अंत १६ मार्च २८८० साली होऊ शकतो. गेली पन्नास वर्षे नासातील खगोलशास्त्रज्ञ एका महाप्रचंड उल्केवर नजर ठेवून आहेत आणि १ मैल व्यास असलेली व १९५० डीए असे नामकरण केलेली ही उल्का वरील दिवशी पृथ्वीवर ताशी ३८ हजार मैलांच्या वेगाने आदळेल असा अंदाज आहे. सध्या ही उल्का सेकंदाला १५ किमीच्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे.
आजपर्यंत पृथ्वीच्या इतिहासात अनेक छोट्या मोठ्या उल्का पृथ्वीवर आदळल्या आहेत. ६५ दशलक्ष वर्षांपूर्वी अशाच महाकाय उल्केमुळे पृथ्वीवरील डायनासोर नष्ट झाल्याचे मानले जाते.१९५० डीए ही उल्का प्रथम २३ फेब्रवारी १९५० रोजी दिसली होती. ती सतत १७ दिवस दिसली व नंतर गायब झाली ती पुन्हा ३१ डिसेंबर २००० साली दिसली. अर्थात ती पृथ्वीच्या जवळ जशी येऊ लागेल तसे तिचा पृष्ठभाग खरवडण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. यामुळे तिचा मार्ग कदाचित बदलू शकतो असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
सध्या सुमारे १४०० लहान मोठ्या उल्का पृथ्वीजवळून जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील मोठ्या उल्का धोकादायक ठरू शकतात आणि या सर्व उल्कांवर नासाची नजर आहे. ही नजर ठेवताना ढग, धुके यांचा अडथळा येऊ नये म्हणून नासातर्फे उल्का ट्रॅकिंग इन्फ्रारेड सेन्सर लवकरच अंतराळात सोडला जाणार आहे असेही सांगितले जात आहे.