शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची तयारी

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर रविवारी शिवसेनेचा पहिलाच दसरा मेळावा होणार आहे. शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र शिवसैनिकांच्या मनात आज बाळासाहेबांची आठवण येणार हे नक्की. दसरा मेळाव्यादिवशी शिवसेनेचे कार्यध्यक्ष उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत.

हायकोर्टाने परवानगी दिल्यामुळे या वर्षीही दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार आहे. त्यातच बाळासाहेबांच्या स्मारकावरून मनोहर जोशी यांनी उद्धव यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा वादही ताजा आहे. त्य़ामुळे उद्धव ठाकरे रविवारी होत असलेल्याच दसरा मेळाव्यात काय बोलतात याकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवाजीपार्कवर दसरा मेळाव्याच्या दिवशी काय बोलतील?, हा शिवसैनिकांसाठी नेहमीच औत्सुक्याचा विषय होता. कुणाची फिरकी घेतील, कुणाची खरडपट्टी काढतील, याची चर्चा शिवसैनिकांमध्ये मेळाव्या आधी होत होती. रविवारी जरी बाळासाहेब ठाकरेशिवाय दसरा मेळावा होत असला तरी, शिवसैनिकांची पावले नक्की शिवाजी पार्ककडे ओढली जातील, असे जाणकारांनी म्हटले आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्याला किती गर्दी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.