
शिवसेना नेते मनोहर जोशी हे शिवसेनेतल्या अशा काही मोजक्या नेत्यातले एक नेते आहेत की ज्यांनी प्रत्यक्षात शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केले आहे. १९६० आणि ७० च्या दशकात त्यांनी मुंबईतले शिवसेनेचे खरे पायाभूत काम केले आहे. आता त्यांच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण झाली असून त्यांच्या निवृत्तीची चर्चा चालली आहे पण अशा नेमक्या याच वेळी त्यांंना निवृत्तीच्या ऐवजी आणखी मोठी पदे मिळण्याच्या महत्त्वाकांक्षेने झपाटले आहे. म्हणून ते काही विधाने आणि काही हालचालींतून बदनाम तसेच वादग्रस्त ठरले आहेत. आज शिवसेनाप्रमुख हयात असते आणि आपल्या स्मारकाच्या कामात कोणी अडचणी आणत आहे असे त्यांना दिसले असते तर त्यांनी त्या अडचणी आणणार्याचे सरकार खाली खेचले असते असे इतिहासात अजरामर ठरावेत असे उद्गार त्यांनी काढले आहेत. आता त्यांना एवढीही गोष्ट समजत नाही की, शिवसेना प्रमुख हयात असते तर त्यांच्या स्मारकाचा प्रश्न तरी कसा निर्मांण झाला असता आणि त्यात कोणी अडचणी आणण्याचा तरी प्रसंग कसा आला असता. मनोहर जोशी यांची शिवसेनेतली प्रतिमा खालावत आहे अशा वेळी त्यांंनी अशी विधाने करावीत हे त्यांच्या भ्रष्ट बुद्धीचे लक्षण आहे.
मनोहर जोशी हे १९९५ साली भाजपा – सेना युतीच्या सरकारचे होते. ते साडेतीन वर्षे या पदावर राहिले. मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचा सर्वपक्षीय जाहीर सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी तरी निदान असे दिसत होते की, शिवसेनेच्या काही ज्येष्ठ नेत्यांवर मात करून त्यांनी ते पद मिळवले होते. त्या वेळी छगन भुजबळ शिवसेनेत असते तर पंतांची वर्णी लागणे मुष्कील होते पण या सत्कार समारंभात श्री. भुजबळ यांनी मनोहर जोशी यांची प्रशंसा केली आणि पंतांचा हिशेब आणि प्लॅनिंग बरोबर असते हे मान्य केले. कदाचित मुख्यमंत्रीपद मिळवताना हे गणित बरोबर ठरले असेल पण त्यांना नंतर मिळालेली दोन केन्द्रीय पदे त्यांच्या नियोजनापेक्षा नशिबाने आणि काही विशिष्ट स्थितीमुळेच मिळाली होती. विशेषत: त्यांना मिळालेले लोकसभेचे सभापतीपद तरी त्यांच्या नशिबानेच मिळाले होते. या झाल्या जुन्या गोष्टी पण आता पंतांंचे नशीब आणि नियोजन या दोन्ही गोष्टी त्यांच्यावर रुसल्या आहेत. म्हणून त्यांंची शिवसेनेत आणि राजकारणात फरपट होत आहे. राजकारणात सारे काही साधायचे असेल तर आधी खासदार किंवा आमदारपद हातात असायला हवे. ते नसले की सारे काही उलटे फिरायला लागते. म्हणूनच लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला तेव्हापासून जोशी सरांची उतरती भांजणी सुरू झाली.
हा मतदारसंघ त्यांना अनुकूल राहिला नसल्याचे शिवसेनेच्या नेत्यांना वाटते. म्हणून त्यांच्या उमेदवारीला विरोध सुरू झाला. मुळात शिवसेनाप्रमुख गेल्यापासून त्यांच्याकडे जुन्या पिढीतले निवृत्तीला आलेले नेते म्हणून पाहिले जायला लागले होते. त्यातच शिवसेनेत त्यांच्या विरोधात एक गट कार्यरत होताच. त्यांच्या लोकसभेच्या उमेदवारीला या गटाने विरोध केला आहे. आधीच पंतांचे राज ठाकरे यांच्याशी आर्थिक संबंध गुंतलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे शिवसैनिक राज ठाकरे यांचा माणूस म्हणून पहात असतात. अशा वातावरणात आपल्या विषयीचा हा संशय वाढणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यायला हवी होती. पण जुन्या जाणत्या माणसाने काही तरी हिताच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत अशा आविर्भावात त्यांनी एक दोनदा नाही तर अनेकदा, राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे असा सल्ला दिला आहे. खरे तर राज आणि उद्धव या दोघांनाही एकत्र यायचे नाही आणि त्यांनी याबाबत कोणाकडे सल्ला मागितलेलाही नाही. पंतांकडे तर नक्कीच नाही पण त्यांनी अनाहूत पणे तसा सल्ला देऊन आपल्यावरचा संशय वाढवून घेतला आहे. इथेच त्यांची गणिते चुकत चालली आहेत. माणसाच्या निवृत्तीची वेळ आली की त्याच्या साठी मौन हे सर्वात उत्तम साधन असते. पण धड निवृत्तही होत नाही आणि धड गप्पही बसत नाही असे काही घडायला लागले की, त्याची उलट शोभा होते.
राजकीय नेत्यांनी महत्त्वाकांक्षी असले पाहिजे पण तिलाही काही तारतम्य असावे. मनोहर पंतांना आता राष्ट्रपतीपदाचे वेध लागले आहेत. त्यांनी तसे एका पत्रकाराशी बोलताना सूचितही केले आहे. राजकारणात काही सांगता येत नाही पण पंतांचे शिवसेनेतच नीट काही चाललेले नाही आणि शिवसेनाच त्यांना पुढे करणार नसेल तर त्यांची ही महत्त्वाकांक्षा पुरी कशी होणार ? पंत तर एकामागे एक विधाने करून आपले शिवसेनेतले स्थानही घालवून बसायला लागले आहेत. त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली तर ती गोष्ट त्यांच्या वरच्या संशयाला बळकटी देणारी ठरेल इतके न समजण्या इतके पंत अनभिज्ञ तर नक्कीच नाहीत पण त्यांनी पवारांची भेट घेतलीच. आता त्यांनी आपल्या हातानेच आपल्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा निर्धारच केला असेल तर आपण तरी काय करणार ? मात्र या सगळ्या घटनांतून पंतांची राजकीय गणिते चुकायला लागली आहेत हे मात्र नक्की.राजकारणात वाईट पॅच येत असतो. पण या पॅचमध्ये जो नेता विवेकाने वागतो तोच त्या पॅचवर मात करून पुढे येतो पण ज्याला ते जमत नाही तो त्या पॅचमध्ये संपून जातो.