काँग्रेस २९ जागेच्या मागणीवर ठाम

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यातील जागावाटपाचा तिढा काही केल्या सुटण्यांची शक्यता दिसत नाही. त्या‍तच आता आघाडीमध्ये काँग्रेसला २९ आणि राष्ट्रवादीला १९ जागा मिळायला हव्यात, यावर आपला पक्ष ठाम असल्याचे मत प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केले.

यावेळी बोलताना प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाच्या मुद्यावरून दिवसेंदिवस राष्ट्रवादी काँग्रेसचा तोल ढासळत चालला आहे. काँग्रेसला कमी लेखणार्याी राष्ट्रवादीच्या नेत्यांना स्वत:च्या पक्षाला सावरण्यासाठी अधिक जागांची गरज भासत आहे. काँग्रेसची चिंता करण्यापेक्षा घरची चिंता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी करावी.’

राष्ट्रसवादीचे प्रवक्ते असलेले नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या वाटेवर आहेत. मुख्यमंत्री वा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर टीका करणे नवाब मलिक यांच्या अधिकार कक्षेत बसत नाही पण सध्या त्यांनी केवळ बराक ओबामा यांनाच सल्ला देण्याचे बाकी ठेवले आहे, असे सावंत यांनी यावेळी बोलताना स्पाष्ट केले.