नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून तेलंगण राज्याच्या निर्मितीच्या विरोधात सीमांध्र भागात उग्र आंदोलने होत असली तरीही आंध्र प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा केंद्राचा विचार नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. तेलंगण राज्याच्या निर्मितीला दिलेल्या मान्यतेबाबत सरकार ठाम असून या निर्णयात बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले.
या संदर्भात मंत्रिगटाने केलेल्या सूचना व शिफारशींच्या आधारे एक पुर्नसघटन विधेयक तयार करून त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने लवकर मंजुरी द्यावी आणि या विधेयकावर त्या राज्याने विचार करण्याची सूचना देण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे करावी, अशी विनंती त्यांना केली जाईल, असे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, ज्युबिली हिल परिसरातील राहत्या घरात उपोषणाला बसलेल्या जगमोहन रेड्डी यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने पोलिसांनी त्यांना एनआयएमएस रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यांच्या रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्याने डॉक्टरांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचा सल्ला दिला होता, असे ज्येष्ठ नेते के. रामकृष्ण यांनी सांगितले.