सुरक्षित प्रसूती भारतात तरी कठीण

भारतात कुटुंब नियोजनाचा खूप गवगवा केला जातो. परंतु कुटुंब नियोजन म्हणजे कमी मुले या पलीकडे कुटुंब नियोजनाची कल्पना कोणी करत नाही. खरे म्हणजे सुरक्षित बाळंतपण हा कुुटुंब नियोजनाचाच एक भाग आहे. भारतात कुटुंब नियोजनाचा बडिवार माजवला जातो, परंतु त्या प्रमाणात सुरक्षित बाळंतपणावर कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे भारतात पहिल्या बाळंतपणात मरणार्‍या किंवा सदोष बाळंतपणामुळे जन्मभर बाळंतरोगाच्या बळी ठरणार्‍या महिलांची संख्या जगात सर्वात जास्त आहे. असुरक्षित बाळंतपण, बाळंतपणाचे तज्ज्ञांचे मार्गदर्शन न मिळणे, संसर्ग आणि बाळाच्या जन्मानंतरच्या काळजीचा अभाव या गोष्टींमुळे केवळ माताच नव्हे तर नवजात मुलांच्या जीवालाही धोका असतो आणि त्यामुळे जन्मल्यानंतरच्या पहिल्या सात दिवसातच अनेक मुले मरण पावतात.

अशा नवजात मुलांच्या मृत्यूच्या बाबतीत भारत देश आघाडीवर आहे. जगात अशा नवजात मुलांच्या मृत्यूमध्ये भारतीय अर्भकांचे प्रमाण २९ टक्के एवढे आहे. जगाच्या कोणत्याही देशामध्ये नवजात मुलांच्या मृत्यूचे एवढे प्रचंड प्रमाण नाही. ६ मे रोजी अर्भक वाचवा दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीत भारताची ही काळी बाजू प्रकाशात आली आहे. भारतामध्ये हे प्रमाण अधिक असण्याची काही विशिष्ट कारणे आहेत. अज्ञान आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव या दोन गोष्टींमुळे प्रामुख्याने हे प्रमाण वाढलेले आढळते.

भारतातल्या महिलांची प्रसूती अजून सुद्धा अकुशल महिलांच्या निगराणीखाली होते. ग्रामीण भागात ६८ टक्के महिला रुग्णालयात बाळंत होतात आणि ३२ टक्के महिलांचे बाळंतपण घरीच सुईणींच्या मार्गदर्शनाखाली होते. अशा महिला बाळंतपणाच्या पद्धतीविषयी काही गोष्टी अनुभवाने जाणून असतात. परंतु त्या संसर्ग किंवा इन्ङ्गेक्शनच्या बाबतीत म्हणाव्या तेवढ्या दक्ष नसतात. त्याचा परिणाम मुलांवर होतो. नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करायचे असेल तर त्यासाठी काही उपाय योजावे लागतील. गरोदर महिलांची नोंद करणे, त्यांचे बाळंतपण शक्यतो रुग्णालयात परिचारिकांच्या निगराणीखाली होणे हे उपाय योजिल्यास हे प्रमाण आपण कमी करू शकू, असा विश्‍वास या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी व्यक्त करत आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment