सीमांध्रमध्ये तणाव कायम

हैदराबाद- तेलंगण निर्मितीला मान्यता दिल्यानंर सीमांध्र भागामध्ये निर्माण झालेला तणाव बुधवारीही कायम होता. मंत्रिमंडळाच्या निर्णयाविरोधात सीमांध्रमधील वीज कर्मचा-यांनी अनिश्चितकालीन संप पुकारल्याने सलग चौथ्या दिवशी सीमांध्र अंधारात होता. या संपात सीमांध्रमधील शिक्षक, सरकारी कर्मचारी, डॉक्टर व वाहतूक विभागातील कर्मचारीही सहभागी झाल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.

तेलंगणविरोधात सीमांध्रमधील 13 जिल्हयांमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. वीज कर्मचारी संपावर गेल्याने सरकारी व खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यातच डॉक्टरांनीही या संपाला पाठिंबा दिल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. वीज पुरवठा होत नसल्याने हवाई व रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जवळपास चार हजार वीज कर्मचारी संपावर गेल्याने वीज निर्मितीचे काम ठप्प झाले आहे.

वीज कर्मचा-यांसह सीमांध्रमधील सहा लाख सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि वाहतूक कर्मचारीही संपावर गेल्यामुळे सरकारी कार्यालये, शाळा व राज्य वाहतूक सेवा विभाग 12 ऑगस्टपासून बंद आहेत. राज्याचे विभाजन होणार नाही याची शाश्वती मुख्यमंत्र्यांकडून मिळत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा पवित्रा कर्मचा-यांनी घेतला आहे.

सरकारसोबत चर्चा करण्यात येणार असल्याचे कर्मचा-यांच्या नेत्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी लोकांना त्रास होऊ नये यासाठी संप मागे घ्यावा असे आवाहन वीज कर्मचा-यांना केले आहे.

Leave a Comment