नवी दिल्ली – कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही नरेंद्र मोदी यांच्या प्रमाणेच तरुण मतदारांवर लक्ष्य केंद्रित केले असून आगामी निवडणुकांनंतर केंद्रात तरुण सरकार सत्तेवर येईल असे म्हटले आहे. तरुणांचे हे सरकार देशाचे कल्याण करू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी जाहीर सभा घेताना त्यांनी आपल्या पक्षाचा हा अजेंडा असल्याचे सूचित केले.
राहुल गांधी यांनी मुस्लीम बहुल अलीगढ आणि रामपूर या दोन जिल्ह्यांचा दौरा केला. विविध ठिकाणी जाहीर सभा घेऊन त्यांनी जातीय दंगलींच्या बाबत काही राजकीय पक्षांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. काही राजकीय पक्ष जातीय दंगली पेटवून मते मिळविण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप त्यांनी केला. त्यांनी हा आरोप करताना कोणत्याही पक्षाचे नाव घेतले नाही, परंतु त्यांचा रोख समाजवादी पार्टीकडे होता.
त्यांच्या या उल्लेखाने चिडलेले रामपूरचे समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी राहुल गांधी यांना चोख उत्तर दिले. जातीय दंगली घडवून मते मिळविण्याच्या बाबतीत कॉंग्रेसचा मोठा इतिहास असल्याचा टोला त्यांनी लगावला. राहुल गांधी यांनी आपल्या या दौर्यामध्ये मुस्लीमबहुल भागांना विशेष करून भेटी दिल्या आणि तिथल्या मतदारांशी संवाद साधला.