चार राज्यांना वादळाचा धोका

नवी दिल्ली – अंदमान-निकोबार बेटाला बुधवारी दुपारी चक्री वादळाचा फटका बसला असून या ठिकाणी केंद्रित झालेले चक्री वादळ आगामी दोन दिवसांत आंध्र प्रदेशाच्या आणि ओरिसाच्या समुद्र किनार्‍यावर घोंगावण्याची शक्यता आहे. पश्‍चिम बंगालला सुद्धा या वादळाचा तडाखा बसणार आहे, त्यामुळे या चारही राज्यातल्या किनारी प्रदेशात राहणार्‍या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून सरकारी यंत्रणा वादळाच्या धोक्याचा सामना करण्यास सज्ज झाली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अंदमान बेटाच्या उत्तर भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या पट्ट्यामुळे अंदमान बेटाच्या मायाबंदर भागात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. हेच वादळ आणखी उत्तरेकडे सरकत पुढच्या ४८ तासात अधिक तीव्र स्वरूपाच्या चक्री वादळात रुपांतरित होईल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. देशाच्या पूर्व किनार्‍याला हे वादळ १२ ऑक्टोबरच्या मध्यरात्री पोचेल आणि १४ ऑक्टोबरपर्यंत ते पुढे सरकत सरकत ओरिसाचा कलिंगपट्टणम् आणि पारादीप बंदरांना जबर तडाखा देईल.

या वादळामुळे पश्‍चिम बंगाल, ओरिसा आणि आंध्र प्रदेशाचा पूर्व किनारी प्रदेश बाधित होईल. त्या परिसरात ताशी १७५ ते १८५ कि.मी. वेगाचे वारे वाहतील आणि मुसळधार पाऊस पडेल. या भागातील मच्छिमारांना मच्छिमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.