लिबीयाच्या पंतप्रधानांचे अपहरण

त्रिपोली- लिबीयाचे पंतप्रधान अली झिदान यांचे गुरुवारी सकाळी अज्ञात सशस्त्र लोकांनी त्रिपोलीतील हॉटेलमधून अपहरण केल्याची माहिती लिबीयन सरकारने दिली आहे. गेल्या आठवडयात अमेरिकच्या विशेष फौजांनी अलकायदाचा प्रमुख दहशतवादी नझीह अब्दुल हमेद अल-रुकाई उर्फ अनस अल-लिबीला त्रिपोलीतील रस्त्यावरु अटक केली होती. त्या कारवाईचा बदला म्हणून झिदान यांचे अपहरण करण्यात आल्याचे बोलले जात आहे. झिदान यांच्या अपहरणावरुन लिबीयन सरकारचा कमकुवतपणा उघड झाला आहे. अली झिदान लिबीयामधल्या हंगामी सरकारचे प्रमुख होते. झिदान यांच्या अपहरणानंतर मंत्रिमंडळाने तातडीची बैठक बोलवली आहे. भर रस्त्यातून अल लिबीला ताब्यात घेण्याच्या अमेरिकन फौजांच्या कृतीवर लिबीयातील दहशतवादी संघटनांमध्ये असंतोष खदखदत होता. अमेरिकन फौजांना लिबीयन सरकारचा पाठिंबा असल्याचा आरोप केला जात होता. सरकारी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार झिदान यांना अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे.