टीम इंडिया-कांगारू आज आमने-सामने

राजकोट : पहिल्या टी २० साठी टीम इंडिया पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एकमेव ट्वेण्टी२० सामना गुरुवारी राजकोट येथील मैदानावर खेळला जाणार आहे.क्रिकेटच्या मैदानात टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे संघ पुन्हा एकदा एकमेकांचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही संघांमधल्या युद्धात पहिली लढाई ट्वेण्टी२०च्या मैदानात होत आहे. या सामन्यासवर पावसाचे सावट आहे. त्या मुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दोन्ही संघामधला एकमेव ट्वेण्टी-२० सामना गुरूवारी राजकोटच्या मैदानात सांयकाळी ७.३० वाजता सुरू होईल. आजवर दोन संघांमध्ये झालेल्या सात ट्वेण्टी२० सामन्यांत टीम इंडियाला केवळ तीनदाच विजय मिळाला आहे, तर चार सामन्यात टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला होता.

या सामन्यात भारतीय चाहत्यांच्या नजरा युवराज सिंगवर असतील. जवळपास सहा-सात महिन्यांनंतर युवी पुन्हा क्रिकेटमध्ये कमबॅक करतो आहे. रोहित शर्मा, शिखर धवन आणि कोहलीच्या मनगटात ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी फोडून काढण्याची ताकद आहे. मधली फळी रैना, युवी आणि धोनीमुळे टीम इंडियाची फलंदाजी अगदी मजबूत बनली आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर भुवनेश्वरचा भेदक मारा आणि अश्विन-जाडेजा जोडीची फिरकी चालली, तर ऑस्ट्रेलियाला गुंडाळणे टीम इंडियाला कठीण जाणार नाही.

तर मायकल क्लार्कच्या अनुपस्थितीत भारत दौऱा म्हणजे ऑस्ट्रेलिया संघासाठी अग्निपरीक्षाच म्हणावी लागेल. क्लार्कच्या गैरहजेरीत जॉर्ज बेली कांगारूंचे नेतृत्त्व करणार आहे. शेन वॉटसन, ब्रॅड हॅडिन, अॅडम वोग्स, मिचेल जॉन्सनसारख्या अनुभवी खेळाडूंचा अपवाद वगळला तर इतर खेळाडूंचा हा पहिलाच भारत दौरा आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघातील अनेकांना आयपीएल आणि चॅम्पियन्स लीगदरम्यान भारतात खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला अगदीच कमी लेखून चालणार नाही.

Leave a Comment