मुंबई : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून १० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप अण्णा हजारे आणि मेधा पाटकर यांनी केला आहे. याच मुद्द्यावरून अण्णांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढला जाणार आहे.
शेतकरी व सभासद यांच्या कष्टातून उभारण्यात आलेले करोडो रुपयांचे साखर कारखाने काही नेत्यांनी कवडीमोल किमतीने विकत घेतले आहेत. त्यामुळे साखर कारखानदारीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. काही जणांनी जवळच्या नातेवाईकांना कवडीमोल भावाने कारखाने भाडे तत्वालवर चालविण्यास दिले आहेत. त्यामुळे कारखान्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राज्यातील साखर कारखाने कवडीमोल किमतीने विकत देणा-यात सत्ताधरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशा सर्वपक्षीयांचा समावेश असल्याचा आरोप अण्णांनी केला आहे. त्याच्या निषेधार्थ अण्णांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढला जाणार आहे.