सूडाचे राजकारण

लालूप्रसाद यादव यांना शिक्षा होताच महाराष्ट्रातही चारा घोटाळा आहे का याचा शोध सुरू झाला. महाराष्ट्राचा लालू कोण यावर राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यात सवाल जबाब सुरू झाले. अजित पवार हेच महाराष्ट्राचे लालूप्रसाद आहेत हे भाजपाने म्हटले तर उलट अजित पवारांनी गोपीनाथ मंुंडे हेच महाराष्ट्राचे लालूप्रसाद आहेत हे सिद्धच करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले नाही. चारा घोटाळा प्रकरणात लालूंना चक्क पाच वर्षांची सजा फर्मावण्यात आली. तिचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहिले नाहीत. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला नवी जाग आली. बिहारातल्या चारा घोटाळ्यापेक्षा मोठा सिंचन घोटाळा महाराष्ट्रात झाला आहे आणि पवार काका-पुतणे हे सुपर लालू आहेत असा साक्षात्कार होऊन त्यांनी पवारांना नव्याने लक्ष्य करायला सुरूवात केली. बिहारातल्या चारा घोटाळ्यात आणि महाराष्ट्रातल्या सिंचन घोटाळ्यात काही साम्य नाही पण शेवटी भ्रष्टाचार तो भ्रष्टाचारच. तेव्हा या सिंचन घोटाळ्याच्या थंड पडलेल्या घोटाळ्याला पुन्हा चेतना देण्याचा प्रयत्न भाजपा नेत्यांनी सुरू केला आणि त्यातून भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा नवा कलगीतुरा सुरू झाला.

यापूर्वी राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू होती. एका आघाडीत असूनही हे दोन पक्ष परस्परांवर किती तुटून पडत होतेे हे आपण पाहिले आहे. त्या सवाल जबाबाने सार्‍या महाराष्ट्राची करमणूक केली आहे. पण आता राष्ट्रवादीला नव्या हल्ल्याला तोंड द्यावे लागत आहे. भारतीय जनता पार्टीच्या या नव्या हल्ल्याला तोंेड देण्यासाठी राष्ट्रवादीने मोठी तयारी केली. आता निवडणुका जवळ आल्या असताना भाजपा नेते पवारांना लक्ष्य करण्याची खेळी करणार याचा अंदाज राष्ट्रवादीला आलेला असल्याने त्यांनी प्रतिहल्ल्याची तयारी ठेवली आहे. पण राष्ट्रवादीची भ्रष्टाचाराची प्रकरणे एवढी मजबूत आहेत की त्यांना भाजपाच्या हल्ल्याला तोेंड देता देता नाकी नव येत आहेत. अजित पवार यांनी हा हल्ला बोथट व्हावा म्हणून गोपीनाथ मुंडे यांना नामोहरम करण्याची खेळी केली. मुंडे यांनी बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तीन कोटी रुपये देणे आहे. या प्रकरणात त्यांना एकदा बदनाम केले की ते पुन्हा तोंेड वर काढणार नाहीत आणि येत्या निवडणुकीत पवारांच्या विरोधात चकार शब्द बोलणार नाहीत अशी अजित पवार यांची कल्पना होती. म्हणून त्यांनी या बँकेवरच्या प्रशासकाला बोलावून घेऊन त्याला थकबाकीच्या प्रकरणात खटले दाखल करण्याचा आदेश दिला.

अजित पवारांनी मुंडे यांच्या घरात फूट पाडून त्यांचे त्यांच्या जिल्ह्यातले वजन कमी करण्याचा डाव टाकलाच आहे पण आता एकदा त्यांना थकबाकीच्या खटल्यात बदनाम केले की, त्यांना राज्यभरात तोंड दाखवायला जागा राहणार नाही अशी अजित पवार यांची कल्पना होती. हा सारा उपद्व्याप कशासाठी तर मुंडे यांनी सत्तेवर आल्यास अजित पवारांचा लालूप्रसाद करण्याची घोषणा केली. राज्य सहकारी बँकेत झालेल्या भ्रष्टाचाराला अजित पवारच जबाबदार आहेत असे म्हणून मुंडे यांनी त्यांना गजाआड करण्याची घोषणा केली. पण अजित पवारांना राज्यात आपल्या विरोधात कोणी काही बोलू शकत नाही असे चित्र तयार करायचे आहे. म्हणून त्यांनी आपला लालू करणार्‍याला आपण त्याच्या आतच आलू करून टाकावे असा विचार केला. प्रशासक हा काही निव्वळ सांगकाम्या नाही. त्याने सगळ्याच बड्या थकबाकीदारांवर खटले दाखल केले. ते काही केवळ मुंडे यांनाच लक्ष्य करू शकत नाहीत. आपल्या देशात अजित पवारांसारख्या दादांची दादागिरी निरंकुशपणे चालू शकत नाही. उगाच हातात सत्ता आहे म्हणून सर्वांवर सूडाचा आसूड ओढता येत नाही. या देशात न्यायालये आहेत आणि अशी मग्रुरी कोणी करायला लागला की त्याला त्याची जागा दाखवण्याचे काम न्यायालये करतात.
म्हणून अशा आदेशांवरून काही कारवाया करताना प्रशासकांना न्यायालयांचा विचार करावा लागतो. तसा तो करीत या प्रशासकांनी सर्वांना न्याय दिला. मुंडे यांच्या सहित सगळ्याच मोठ्या थकबाकीदारांवर खटले दाखल केले. या कारवाईत अजित पवार यांची पुरती फजिती झाली कारण या कारवाईच्या जाळ्यात नेमके मुंडेच अडकले नाहीत. मुंडे अडकले नाहीत म्हणजे गोपीनाथ मुंडे अडकले नाहीत. अजित पवारांच्या दरबारात मुजरा करण्याचे काम पत्करलेले पंडितराव मुंडे मात्र अडकले. मुंडेंचा सूड घेणे तर दूरच राहिले पण या जिल्ह्यात राष्ट्रवादीला बळ देणारे अन्य नेते मात्र सापडले. आता त्यांना कसे वाचवावे याची चिंता अजित पवार यांना लागली आहे. येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीला काही फार चांगले भवितव्य दिसत नाही. त्यामुळे निराश झालेले अजित पवार सत्तेचा वापर करून सर्वांना जेरीस आणण्याचा प्रयत्न करतील तर ते त्यांच्या अंगलट येणार आहे. जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसर्‍यांच्या घरांवर दगड फेकू नयेत अशी इंग्रजी म्हण आहे. तिचा पुरता प्रत्यय अजित पवार यांना येत आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष कोणालाच भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्रस्त करू शकत नाही कारण राज्यातली किती तरी भ्रष्टाचाराची प्रकरणे त्यांच्या खात्यात जमा आहेत.

Leave a Comment