श्रीनिवासन यांना न्यायालयाचा दिलासा

नवी दिल्ली- बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन यांना मंगळवारी परवानगी दिली. तसेच कामकाजात सहभागी होण्यासही परवानगी दिली आहे. मात्र श्रीनिवासन यांनी आयपीएल स्पॉट फिक्सिंगसाठी नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीच्या कामकाजात कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ करु नये, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी न्यायालयाने सोमवारी त्रिसदस्यीय चौकशी समितीची घोषणा केली आहे. या चौकशी समितीने चार महिन्यात आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अहवाल सादर करावा असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी श्रीनिवासन यांची लोकशाही निवडणूकीद्वारे निवड झाली आहे. तसेच त्यांच्यावर वैयक्तिक भ्रष्टाचार केल्याचा कोणताही आरोप नाही, त्यामुळे त्यांना अध्यक्षपदापासून दूर ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

मात्र आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीनिवासन यांचा जावई व चेन्नई सुपर किंग्ज संघाचा मुख्य कार्यकारी अधिकारी गुरूनाथ मैयप्पन हा प्रमुख आरोपी आहे. त्यामुळे याप्रकरणी निष्पक्ष चौकशी होण्यासाठी श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन हटवण्याची मागणी करणारी याचिका बिहार क्रिकेट असोसिएशनने दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान मंगळवारी न्यायालयाने हा आदेश दिला.