तिलकरत्ने दिलशान होणार निवृत्त

कोलंबो – श्रीलंकेचा आक्रमक सलामीवीर तिलकरत्ने दिलशानने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी कोलंबोमध्ये दिलशान त्याच्या निवृत्तीची औपचारिक घोषणा करणार आहे. येत्या 14 ऑक्टोंबरला दिलशान 37 वर्षांचा होणार आहे. दिलशान कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार असला तरी, एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र खेळत रहाणार आहे. एकदिवसीय आणि ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये दिलशान प्रतिस्पर्धी संघासाठी धोकादायक फलंदाज म्हणून ओळखला जातो. नोव्हेंबर 1999 मध्ये बुलावायोमध्ये झिम्बाब्वे विरोधात दिलशानने कसोटी पदार्पण केले होते. 87 कसोटी सामन्यात दिलशानने 40.98 च्या सरासरीने 5492 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्याच्या नावावर 16 शतके आणि 23 अर्धशतके जमा आहेत.

कोलंबोमध्ये मार्च महिन्यात बांग्लादेश विरुध्द तो अखेरचा कसोटी सामना खेळला. जून 2011 मध्ये ऐतिहासिक लॉडर्स मैदानावर इंग्लंडविरुध्द 193 धावा ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी आहे. संघासाठी वेगाने धावा जमवणे हे दिलशानचे वैशिष्टय आहे. क्रिकेट खेळताना त्याने एका वेगळया प्रकारच्या फटक्याचाही शोध लावला. जो क्रिकेटमध्ये दिलस्कूप म्हणून ओळखला जातो. या फटक्यावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा जमवल्या.

Leave a Comment