मुंबई – मुंबई क्रिकेट असोसिएशनची द्वैवार्षिक निवडणुक १८ ऑक्टोबर रोजी होत आहे. या निवडणूकीसाठी भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी अध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. त्यामुळे आता आगामी काळात शरद पवार विरूद़ध मुंडे अशी लढत पाहण्यावस मिळणार आहे. दरम्याजन अध्य्क्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील उत्सुक आहेत. त्यामुळे यावेळेसची निवडणूक रंगतदार ठरणार असे दिसते.
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी वानखेडे स्टेडियममध्ये आपले समर्थक राज पुरोहित आणि रवी सावंत यांच्या पॅनलचे एक उमेदवार आशिष शेलार यांच्यासमवेत जाऊन अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. आशिष शेलार यांनी मुंडे यांच्या उमेदवारीला अनुमोदन दिले आहे. मुंडे यांनी याआधीच स्टायलो क्रिकेट क्लबचे मतदार व प्रतिनिधी म्हणून अर्ज दाखल केला होता. गोपीनाथ मुंडे यांनी अध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्यामुळे उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे. शरद पवार हे तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरतात का, हे जाणून घेण्यासाठी काही जण प्रयत्न करीत आहेत. शरद पवार बिनविरोध येऊ नयेत यासाठी सारा खटाटोप सुरू आहे.
मुंडे यांच्याप्रमाणे अन्य १४ राजकीय नेतेमंडळींनीही विविध क्लबचे मतदार म्हणून अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांचादेखील समावेश आहे. शिवसेना, मनसे, भाजप, राष्ट्रवादी या सर्व पक्षांनी आपापले मतदार प्रतिनिधी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत उतरवले आहेत. मुबंई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाच्या स्पर्धेत आता अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी सहभाग घेतला आहे. या पदासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणदेखील उत्सुक आहेत. यामुळे ते एमसीएच्या अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.