शौचालयांची चर्चा हवीच

काही काही शब्द उगाच अशिष्ट समजले जातात आणि कोणी तरी त्यांचा उच्चार करताना काही तरी गडबड केली की त्या उच्चारात तो शब्द आला या एकाच कारणावरून त्या माणसावर नाही नाही ते आरोप केले जातात. त्याचे अनेक अर्थ काढले जातात आणि एरवी त्याला पाण्यात पाहणारे लोक तेवढेच निमित्त करून त्याला झोडपून काढायला लागतात. शौचालय हा असाच एक़ शब्द. शौचालय घाण असते असा अनेकांचा समज आहे. अर्थात तो गैरसमज आहे कारण त्यांनी कधी स्वच्छ शौचालये पाहिलेलीच नसतात. तेव्हा एखाद्या माणसाने शौचालयांची चर्चा सुरू केली तरीही हे लोक नाक डोळे मोडायला लागतात. कसली तरी घाण चर्चा सुरू झालीय असे ते भासवायला लागतात. पण जो माणूस शौचालयांची चर्चा सुरू करतो त्याला ती चर्चा स्वच्छतेच्या संदर्भात करायची असते. त्याला शौचालयांचा अभाव आणि त्यापोटी निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्‍न सतावत असतात आणि त्यापोटी त्याला ती चर्चा करायची असते. आता आता आपल्या देशात केन्द्रीय ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश आणि भाजपा नेते नरेन्द्र मोदी यांनी या प्रश्‍नावर चर्चा उपस्थित केली या एका गोष्टीवरून त्यांच्या विरोधात गदारोळ माजला आहे.

भारतात उघड्यावर शौचाला बसण्याची प्रथा आहे. ती अनेकांना खटकते कारण ही प्रथा केवळ खेड्यांपुरतीच आहे असे नाही तर मोठ्या शहरांतही आहे आणि मुंबई सारख्या शहरांतही बाहेर देशातले पाहुणे आले की त्यांंना शहराच्या विविध भागांत असे शौचाला बसलेले लोक दिसतात तेव्हा त्यांना किळस येते. ही प्रथा भारतात सर्वात अधिक प्रमाणात पाळली जाते आणि आजवर महात्मा गांधी वगळता कोणीही फारहा गांभीर्याने विचार केला नाही. शौचाला उघड्यावर बसण्याचे लोकांवर होणारे परिणाम तर गंभीर आहेतच पण या प्रथेमुळे त्या त्या भागांची स्वच्छता राखण्यासाठी ती घाण माणसांना खराट्याने साफ करावी लागते. ती घाण त्यांना बादलीत भरून डोक्यावरून गावाबाहेर नेऊन टाकावी लागते. अशा प्रकारची ही मानवतेला काळीमा लावणारी प्रथा केवळ या उघड्यावर शौचाला बसण्याच्या अनिष्ट प्रथेमुळे टिकून आहे. देशात भंगीमुक्तीच्या वल्गना अनेकदा करण्यात आल्या आहेत पण त्या फोल ठरल्या आहेत.

आपल्या देशात दारिद्य्र रेषेखालचे जीवन जगणार्‍या कुटुंंबांना त्या रेषेच्या वर आणण्याचा प्रयत्न जारी आहे. पण हा प्रयत्न होत असतानाच काही कुटुंबांचा प्रवास उलटा सुरू आहे. ती आधी या रेषेच्या वरचे जीवन जगत होती. ती नंतर या रेषेच्या खाली आली. काल पर्यंत आपल्या स्वत:च्या जीवनावश्यक गरजा स्वत:च भागवत होती पण नंतर अशी काही तरी घटना घडते की, त्यांची स्थिती खालावते. या उलट्या प्रवासाची तीन कारणे सांगितली जातात. पहिले कारण घरात होणार्‍या लग्नाचे. म्हणजे झेपत नसतानाही कर्ज काढून धुमधडाक्यात विवाह करणे. असे केले की डोक्यावर कर्जाचा भार वाढतो आणि तो फेडता फेडता ते कुटुंब गरीब होते. दुसरे कारण व्यसनाचे. घरातल्या एखाद्या माणसाला दारूसारखे व्यसन जडले की त्याची कमाई त्या व्यसनातच खर्च होते आणि कुटुंबाची स्थिती खालावते. तिसरे कारण आहे ते आरोग्याचे. घरातला एखादा सदस्य आजारी पडला की त्याच्या आजारावर एवढा खर्च होतो की त्या कुटुंबाची अवस्था वार्ईट होते. मात्र ग्रामीण भागातली रोगराई उघड्यावर शौचाला बसण्यामुळेच प्रामुख्याने निर्माण होत असते. याचा अर्थ असा की ही अनारोग्यकारक सवय ही आपल्या आरोग्यालाच नाही तर गरिबीलाही कारणीभूत आहे.

तेव्हा जयराम रमेश यांनी आपल्या देशातल्या लोकांच्या शौचालयाविषयीच्या अनास्थेवर वार करताना ही वस्तुस्थिती दाखवून दिली की, एखाद्या खेड्यात मंदिरे दहापाच तरी असतात पण शौचालय नसतेच. नरेन्द्र मोदी यांनीही हीच स्थिती दाखवून दिली. देवालये बांधण्यापेक्षा शौचालये बांधण्यास प्राधान्य दिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. पण या दोघांवरही टीका झाली. त्यांनी देवाचा आरोप केला गेला. पण त्यांना नेमके काय म्हणायचे होते हे समजून घेतले तर आपल्या या आरोपात काहीच तथ्य नाही हे समजते. या दोघांच्या म्हणण्यात काहीच चूक नाही. तेव्हा त्यांना नेमके काय म्हणायचे होते ते दाखवून दिले पाहिजे. या दोघांच्या या वक्तव्यावरून वाद घालण्यात वेळ खर्चण्याची काही गरज नाही. त्यांच्या वक्तव्यामुळे शौचालये हा विषय निदान चर्चेत तरी आला. आपल्या देशातले ६० टक्के लोक उघडयावर शौचाला बसत असतात हे तरी समजले आणि आता ही स्थिती बदलली पाहिजे ही प्रेरणा तरी समाजाला मिळाली. तिच्या अनुरोधाने आता लोकांना शौचालयांचे प्रश्‍न समजून सांगितले पाहिजेत.