तेलंगणाचा महागुंता

तेलंगण राज्याच्या निर्मितीच्या निमित्ताने आंध्र प्रदेशात जे काही विचित्र राजकारण सुरू झाले आहे. त्या राजकारणाचा विलक्षण गुंता झाला आहे. असे पूर्वी म्हटले जात असे. परंतु कालपासून आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री असलेल्या चंद्राबाबू नायडू यांनी या सार्‍या राजकारणातला गुंता आणखीन वाढवत नेत नवी दिल्लीत उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे तेलंगणाचा गुंता हा नुसता गुंता राहिला नसून महागुंता होऊन बसला आहे. त्यातून पुढे काय काय निर्माण होणार आहे याचा काही अंदाजच येत नाही. कारण तेलंगणाला विरोध करणार्‍या संघटना आणि लोक आता एवढे आक्रमक झाले आहेत की त्यांच्या आंदोलनामुळे उर्वरित आंध्र प्रदेशातील जनजीवन जवळ जवळ ठप्प झाले आहे. सरकारी कार्यालये बंद आहेत. वीज निर्मिती कमालीची कमी झाली आहे आणि त्यामुळे हजारो गावे अंधारात बुडाली आहेत. परिणामी लोक कसे जगत आहेत याचे आश्‍चर्य वाटावे अशी विचित्र अवस्था आलेली आहे. त्यातच चंद्राबाबू नायडू यांनी हे राजकारण दिल्लीपर्यंत नेले आहे. वायएसआर कॉंग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी हे आता तुरुंगातून सुटले आहेत. ते बाहेर आल्यानंतर कॉंगे्रेस पक्षाल किती महागात पडतील यावर चर्चा होती. पण आता प्रत्यक्षात ती कॉंग्रेसला तेलंगणाच्या मुद्यावरून मोठे अडचणीत आणणार आहेत.

उर्वरित आंध्र प्रदेशामध्ये गेल्या अडीच महिन्यापासून अक्षरशः बेबंदशाही माजली आहे. गेले दोन अडीच महिने व्यवस्था नावाची काही चीज शिल्लक राहिलेली नाही. आंदोलकांनी परिस्थितीचा ताबा घेतलेला आहे आणि या भागात अराजक पसरलेले आहे. देशामध्ये आजपर्यंत अनेक आंदोलने झाली. किंबहुना तेलंगण मागणीचे आंदोलन अलीकडेच आपण पाहिलेले आहे. मात्र अडीच महिने सरकारी कार्यालय पूर्णपणे बंद पडलेली आहेत. शासन नावाची व्यवस्था एवढा प्रदीर्घकाळ चालतच नाही. शासकीय कार्यालय पूर्णपणे बंद असतात. अशी गंभीर परिस्थिती आतापर्यंत तरी कोणत्याही आंदोलनात निर्माण झालेली दिसली नाही. राज्याच्या विभाजनाला विरोध करण्याच्या निमित्ताने सुरू असलेल्या आंदोलनाने एवढे तीव्र स्वरूप धारण केले आहे की विजयनगरमध्ये जमावाने केलेल्या प्रचंड जाळपोळीमुळे परिस्थिती चिंताजनक झाली असून शहरात संचारबंदी लागू करून दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या तरी सरकारने तेलंगणाच्या राजधानीच्याबाबतीत तडजोडीचा प्रस्ताव मांडून मंजूर करून घेतलेला आहे. हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी असेल आणि आगामी दहा वर्षे ती सीमांध्रा भागाचीसुध्दा राजधानी असेल. असे सरकारने जाहीर केले आहे.

दहा वर्षानंतर का होईना सीमांध्रा भागाला स्वतंत्र राजधानी उभा रहावी लागणार आहे आणि त्या दृष्टीने विशाखापट्टणम आणि विजयनगर या दोन शहरांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा विजयनगर शहरामध्येच प्रचंड जाळपोळ सुरू आहे. जाळपोळीचे प्रमाण फार वाढल्यामुळे तिथे शनिवारी संचारबंदी लागू करण्यात आली होती. परंतु लोकांनी संचारबंदीला न जुमानता रस्त्यावर येऊन पुन्हा जाळपोळ सुरू केली, त्यामुळे दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले. दंगलखोर जमावाने प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बोत्सा सत्यनारायण यांच्या घराला वारंवार लक्ष्य केले आणि त्यांचे घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. आंध्र प्रदेशाचे विभाजन रोखण्यात सत्यनारायण यांना अपयश आल्याची लोकांची भावना झाली आहे. त्यामुळे लोकांनी त्यांच्या घराला लक्ष्य केले आहे. पोलिसांनी आता सत्यनारायण यांच्या घराभोवती विशेष पहारा बसवला आहे. लोकांचा राग कॉंग्रेस पक्षावर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनाही लोकांना लक्ष्य केले असते. लोकांच्या रागाचा अंदाज घेऊन स्वतःच पक्षामध्ये बंडखोरीचा राग आळवायला सुरूवात केली आहे.

कॉंग्रेस श्रेष्ठींच्या विरोधात आपण बंड करणार असून स्वतंत्र पक्ष स्थापन करणार आहोत अशी आवई त्यांनी उठवली आहे. त्यामुळे सीमांध्रा भागातील जनतेच्या भावनांचे बळी होण्यापासून त्यांचा बचाव झाला आहे. त्यांना खरोखरच उद्या स्वतंत्र पक्ष स्थापन करावा लागलाच तर कॉंग्रेससाठी ती गोष्ट फारच हानीकारक ठरणार आहे. तेलंगण भागात कॉंग्रेस रसातळाला गेली आहेच पण उर्वरित आंध्रातसुध्दा तिला घरघर लागली आहे. या भागातले लोक राज्य निर्मितिच्या विरोधाशिवाय काहीच ऐकायला तयार नाहीत. अशावेळी निःसंदिग्धपणे केवळ राज्याच्या विभाजनाला विरोध करणार्‍या जगनमोहन रेड्डी यांनाच लोकांचा पाठिंबा मिळत आहे आणि त्यांनीही लोकांच्या भावना विचारात घेऊन आपली ही भूमिका अधिक तीव्र केली आहे. त्यांच्यासाठी ही गोष्ट सोपी आहे. कारण हैदराबाद शहरात त्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत. म्हणून त्यांना विभाजन नको आहे. त्यांच्या विभाजनाच्या विरोधामुळे तेलंगणात त्यांना काही गमवावे लागले तर त्याची त्यांना चिंता नाही. कारण त्यांना तेलंगणात पाठिंब्याची अपेक्षाच नाही. त्यामुळे राज्य विभाजनाला असलेला विरोध अभिनिवेशाने मांडत आहेत. मात्र चंद्राबाबू नायडू यांची अवस्था विचित्र झाली आहे. आता आत्तापर्यंत ते विभाजनाच्या विरोधात होते. पुढे त्यांनी तेलंगण निर्मितीला पाठिंबा दिला आणि आता उर्वरित आंध्रात आपला पक्ष टिकावा म्हणून त्यांनी पुन्हा एकदा तेलंगण विरोधाची भूमिका घेतली आहे. या मुद्यावर त्यांना आता जगनमोहन रेड्डी यांच्याशी स्पर्धा करावी लागणार आहे. आपण तेलंगणाचे कट्टर विरोधक आहोत हे त्यांना पुन्हा एकदा दाखवून द्यावे लागणार आहे. म्हणून त्यांनी जगनमोहन रेड्डी यांच्या पुढे जाऊन थेट दिल्लीतच आमरण उपोषण सुरू केले आहे. आता राज्य विभाजनाला विरोध करण्याची भूमिका कोण जास्त जोरकसपणे मांडतोय याची स्पर्धा सुरू झाली आहे.

Leave a Comment