कमी वयात टक्कल

सामान्य प्रकृतीच्या माणसाला पंचेचाळीशीनंतर केस विंचरताना कंगव्यावर काही केस दिसतात. हळू हळू केस कमी होतात आणि साठी गाठेपर्यंत त्याला टक्कल पडलेले असते. टक्कल हे साठीचेच लक्षण मानले जाते, परंतु आता नव्या पिढीत तिशीलाच टक्कल पडायला लागली आहे. आपल्या आसपास तिशीसुद्धा न ओलांडलेले अनेक टकलू दिसायला लागले आहेत. यामागची कारणे काय? खरे म्हणजे टक्कल हे अनुवांशिक मानले जाते. म्हणजे वडिलांना टक्कल असेल तर मुलालाही ते पडते. परंतु अशा प्रकारचा अनुवांशिंक टकलुपणा हा कमी वयात टक्कल पडण्यास कारणीभूत ठरत नाही. अनुवांशिक टक्कल असेल तर ते साठीतच पडते. मग विशीत किंवा तिशीत टक्कल पडण्याचे कारण काय? त्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे तणाव.

तेव्हा तणाव कमी करायला शिकलो आणि तणावावर मात करायला शिकलो तर लवकर टक्कल पडणे टळू शकते. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे पोषक अन्नाचा अभाव. आपल्या शरीरामध्ये आवश्यक असलेली काही सूक्ष्म पोषण द्रव्ये कमी पडली की, शरीरामध्ये डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन हे हार्मोन तयार व्हायला लागते आणि हे हार्मोन केस गळण्यास कारणीभूत ठरते. हे हार्मोन चुकीच्या जीवन पद्धतीतूनही निर्माण होत असते. तेव्हा जीवन पद्धती चांगली, निरोगी ठेवणे गरजेचे आहे. आपल्या शरीरामध्ये धूम्रपानामुळेसुद्धा काही बदल होतात. त्या बदलांमुळे शरीराला ऑक्सिजन कमी मिळतो आणि ऑक्सिजन कमी मिळाला की, केसांच्या मुळांचा आधार कच्चा होऊन केस गळायला लागतात. धूम्रपानातून शरीरामध्ये घेतले जाणारे निकोटिन हे विषारी द्रव्य रक्ताचा प्रवाह मंद करते आणि परिणामी केसांची वाढ खुंटते. म्हणजे सिगारेट ओढणे हे सुद्धा टक्कल पडण्याचे एक कारण आहे.

कमी झोप मिळणे आणि ब जीवनसत्वाचा अभाव यामुळेही लवकर टक्कल पडते. झिंक, आयर्न आणि मॅग्नेशियम ही मूलद्रव्ये शरीराला तर आवश्यक आहेतच, पण केसांनाही जरूरी आहे. अन्नद्रव्यांमध्ये दुधाचा वापर वाढवावा. बदाम खावेत आणि केसांना सुद्धा बदामाचे तेल लावावेत. पालकाची भाजी जास्त खावी. संत्री खावीत. अंडी त्याचबरोबर सोयाबीन यांचाही आहारात वापर वाढवावा. डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन हे केसांना घातक असते आणि ग्रीन टी त्याची वाढ कमी करते आणि केसांच्या वाढीला गती देते. म्हणून ग्रीन टी प्यावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment