नवी दिल्ली – टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि पुनरागमन करणारा मधल्या फळीचा आक्रमक फलंदाज युवराजसिंग यांना आगामी काळात होत असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत विक्रम करण्याची संधी आहे. त्यांना या सात एकदिवसीय सामन्यात एकहजारी बनण्याची संधी असेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये युवराजने ३५ सामन्यांत ९६२ धावा काढल्या आहेत, तर धोनीने २९ सामन्यांत ८४० धावा ठोकल्या आहेत. हे दोघेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत एक हजार धावांचा टप्पा ओलांडू शकतात. दोघांकडे सचिननंतर (३०७७ धावा) ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक हजार धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज बनण्याची संधी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सात वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. दोन्ही देशांत आतापर्यंत झालेल्या १०९ सामन्यांत टीम इंडियाने ३७ सामने जिंकले असून, ६४ मध्ये पराभव झाला आहे. आठ सामन्यांचा कसलाच निकाल आला नाही.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने चॅम्पियन्स लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत दुहेरी यश संपादन केले. त्याने मुंबईला विजेतेपद मिळवून देण्याबरोबरच आपल्या चार हजार धावा पूर्ण केल्या आहेत. या स्वरूपात हे यश मिळवणारा रोहित हा सुरेश रैनापाठोपाठ दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. आगामी काळात त्याला आता टीम इंडियाचा सलामीवीर होण्याचची संधी चालून आली आहे.