हैदराबाद – आंध्र प्रदेशाच्या विभाजनाला विरोध करण्याच्या निमित्ताने सुरू असलेल्या आंदोलनाने तीव्र स्वरूप धारण केले आहे. विजयनगरमध्ये जमावाने केलेल्या प्रचंड जाळपोळीमुळे परिस्थिती चिंताजनक झाली असून शहरात संचारबंदी लागू करून दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शनिवारी रात्री विजयनगरमध्ये जाळपोळीचे प्रमाण फार वाढल्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली होती. परंतु लोकांनी संचारबंदीला न जुमानता रस्त्यावर येऊन पुन्हा जाळपोळ सुरू केली, त्यामुळे दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले. दंगलखोर जमावाने प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बोत्सा सत्यनारायण यांच्या घराला वारंवार लक्ष्य केले आणि त्यांचे घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
आंध्र प्रदेशाचे विभाजन रोखण्यात सत्यनारायण यांना अपयश आल्याची लोकांची भावना झाली आहे. त्यामुळे लोकांनी त्यांच्या घराला लक्ष्य केले आहे. पोलिसांनी आता सत्यनारायण यांच्या घराभोवती विशेष पहारा बसवला आहे. सार्वत्रिक संप सुरू असल्यामुळे सीमांध्रा भागातील १३ जिल्ह्यातील वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहेत. कित्येक खेडी अंधारात बुडली आहेत.