पुण्यातील सामना तासभर आधी सुरु होणार

पुणे- आगामी काळात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सात एकदिवसीय सामन्यांची मालिका होत आहे. १३ ऑक्टोबर रोजी दोन्ही संघादरम्यान पहिला एकदिवसीय सामना पुण्यात होणार आहे. या सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला असून, हा सामना तासभर आधी सुरु केला जाणार आहे. या बाबतची माहिती बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी दिली. एक तास सामना सुरु करण्याचे अधिकृत कारण बीसीसीआयकडून स्पयष्टा करण्यात आले नाही. थंडी असल्याने दुस-या सत्रात दव पडेल व त्याचा संघाच्या कामगिरीवर परिणाम होईल या कारणामुळे सामना एक तास पुर्वी होणार असल्याचे समजते.

पूर्वनियोजित वेळेनुसार हा सामना दुपारी अडीच वाजता सुरू होणार होता. मात्र आता तो दीड वाजता सुरू होईल. नव्या वेळापत्रकानुसार पहिले सत्र दुपारी दीड ते पाच, तर दुसरे सत्र ५.४५ ते ९.१५असे असेल. पुण्यात १३ ऑक्टोबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सात एकदिवसीय सामन्यातील मालिकेला प्रारंभ होत आहे.

पुण्यात पहिलाच सामना खेळविण्यात येत असून, ऑक्टोबर महिना सुरु झाल्यापासून पुण्यात थंडी वाढू लागली आहे. पुढील आठवड्यात त्यात आणखी वाढ होईल, असे गृहित धरून हा बदल केला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. थंडी असल्याने दुस-या सत्रात दव पडेल व त्याचा संघाच्या कामगिरीवर परिणाम होतो, हे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यापूर्वीच बीसीसीआयने खबरदारी घेतल्याचे दिसून येते.