तेलंगणच्या निर्मितीला विरोध, आज आंध्रात बंद

नवी दिल्ली- तेलंगण राज्याच्या निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखविला. मात्र, त्याचे पडसाद आंध्र प्रदेशात उमटले आहेत. विविध पक्षांकडून शुक्रवारी आंध्र बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय पर्यटन विकास राज्यमंत्री चिरंजीवी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आंध्र प्रदेशाच्या विभाजनाला सीमांध्र आणि रायलसीमा भागातून तीव्र विरोध होत आहे. आंध्र प्रदेशाच्या विभाजनासाठी आता मंत्र्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

शुक्रवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंध्र प्रदेश अखंड राहावा, या मागणीसाठी नागरिकांनी निदर्शने केली. यात तेलगू देशम पक्षाचे राज्यसभेतील सदस्य सी. एम. रमेश यांचाही समावेश होता. मात्र नागरिकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत मंत्रिमंडळाने नव्या राज्याच्या निर्मितीला मान्यता दिली.केंद्रीय मंत्रिमंडळानं स्वतंत्र तेलंगणा राज्याला मान्यता दिली असली तरी आंध्र प्रदेशातील काँग्रेससह सर्वच पक्षांच्या नेते तेलंगणाच्या विरोधात एकवटले आहेत. केंद्रीय पर्यटन विकास राज्यमंत्री चिरंजीवी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तर मनुष्य बळ विकासमंत्री पल्लम राजू यांनीही राजीनाम्याची तयारी दाखवली आहे.

वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी आंध्रप्रदेशात ७२ तासांचा बंद पुकारला. टीडीपीचे चंद्राबाबू नायडूंनीही कॅबिनेटच्या निर्णयावर टीका केली. स्वतंत्र तेलंगणाला आंध्रच्या जनतेनं रस्त्यावर उतरून उत्स्फूर्त विरोध दर्शवल्याचं चंद्राबाबूंनी दावा केला आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशाच्या विभाजनासाठी आता मंत्र्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. हैदराबाद ही नव्याने निर्माण होणारे तेलंगण आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांची दहा वर्षांसाठी संयुक्त राजधानी असेल. दोन्ही राज्यांसाठी निधीचे वाटप कशा प्रकारे करायचे याबाबतच्या शिफारशी मंत्रिगट करणार आहे. नव्या राज्यामध्ये सध्याच्या आंध्र प्रदेशातील २३ जिल्ह्यांपैकी १० जिल्हे असतील, असे माहिती शिंदे यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment