सांध्याची झीज भरून काढण्यासाठी

आपल्या शरीराच्या हालचाली सांध्यांमुळे शक्य होत असतात. सांध्यांच्या दोन हाडांच्यामध्ये वंगणासारखा पदार्थ असतो म्हणून सांध्यांची हाडे एकमेकांवर घासली तरी हाडांची झीज होत नाही. परंतु हाडांचे वारंवार घर्षण होऊन आणि आहारातल्या काही दोषांमुळे हे वंगण संपून जाते आणि हाडांचे सांधे दुखायला लागतात. त्याला ऑस्टिओ अर्थ्रायटीस असे म्हणतात. अशा लोकांना होत असलेल्या हाडांच्या वेदना कमी व्हाव्यात म्हणून सध्या काही उपचार केले जात असतात.

काही वेळा इंजेक्शन दिले जाते तर काही वेळा काही गोळ्या औषधे देऊन या वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु मूळ दुखणे वंगणाचा र्‍हास हे असते. तिथे वंगण पोहोचवणे हा त्या मूळ दुखण्या वरचा इलाज असतो. मात्र ते शक्य होत नाही. आता अमेरिकेतल्या काही शास्त्रज्ञांनी मसाज करून त्या सांध्यापर्यंत पोहचू शकणारे वंगण तेल वजा औषध शोधून काढले आहे. त्याने मसाज केला म्हणजे त्या सांध्यापर्यंत ते तेल जाऊन पोहोचते आणि काही काळ का होईना पण चांगला आराम पडतो. अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठातील बायो मेडिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. मार्क डब्ल्यू. ग्रीनस्टाङ्ग यांनी हे तेल शोधून काढले आहे.

जगामध्ये जवळपास २० कोटी लोक या विकाराने आजारी आहेत. सांधे दुखणे आणि हाडांना सूज येणे आदी त्रास त्यांना होत असतात. त्यांना या औषधाचा उपयोग होणार आहे. हे औषध म्हणजे एक प्रकारचे कृत्रिम पॉलिमर असून ते अन्य काही संशोधनाच्या निमित्ताने शोधण्यात आलेले आहेत. ते शोधण्यामागचा हेतू वैद्यकीय नव्हता. बांधकामासंबधीच्या काही संशोधनामध्ये अशा प्रकारचे पॉलिमर शोधण्याचे काम सुरू होते. मात्र ते वापरताना तिथल्या शास्त्रज्ञांना आणि तंत्रज्ञांना वेगळाच रिलीङ्ग मिळायला लागला आणि त्यातल्या कोणाच्या तरी डोक्यामध्ये या अनुभवामुळे या पॉलिमरचा वापर वैद्यकीय स्वरूपात का करू नये अशी कल्पना चमकून गेली. कारण तिथले तंत्रज्ञ या पॉलिमरचा वापर करत असत तेव्हा त्यांच्या दुखणार्‍या सांध्यातल्या वेदना कमी होत असत. त्याशिवाय या वेदनातून मिळणारी सुटका ही तात्पुरती नसे. एखाद्या सांध्यावर ते चोळून लावले की पुढचे दोन दिवस वेदना थांबत असत. त्यातून त्याचा औषध म्हणून वापर करण्याची कल्पना पुढे आली.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही