
पुणे, – रिक्षा प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात आता बदल करून एक किलोमीटर ऐवजी आता पहिला टप्पा दीड किलोमीटरचा करण्यात आहे आहे. रिक्षा भाडे वाढीच्या निर्णयावर शनिवारी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या ( आरटीए) बैठकीत शिकामोर्तब करण्यात आल्याने प्रवाश्यांना आता दीड कि.मी.साठी 17 रूपये मोजावे लागणार आहेत.
मुंबईसह राज्यातील अन्य शहरांमध्ये अमलात आणलेला हा निर्णय पुण्यात लागू झाल्यास इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये बदल करावा लागणार आहे. रिक्षा प्रवासाचा पहिला टप्पा दीड किलोमीटरचा करण्याची मागणी पुण्यातील विविध रिक्षा संघटनांनी केली होती. मात्र, जवळपास 95 टक्के रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर असल्याने अशा प्रकारचा निर्णय घेता येणार नसल्याचे सांगत संघटनांची मागणी फेटाळण्यात आली होती. परंतु, आता पुन्हा तीच मागणी केली जात असल्याने अखेर दीड किलोमीटरचा टप्पा करण्यात आला आहे. यामुळे शहरातील सुमारे 45 हजार रिक्षाच्या मीटरमध्ये आवश्यक ते बदल करून घ्यावे लागणार आहेत.
शनिवारी आरटीएच्या बैठकीत पहिल्या टप्प्यला 17 रुपये भाडे निश्चित करण्यात आले असून त्यापुढील प्रत्येक टप्पा शंभर मीटरचा असणार आहे. एका किलोमिटर साठी 11 रूपये 65 पैसे असे भाडे निश्चित करण्यत आले आहे. नविन भाडेवाढ 15 आक्टोबर पासून पुणे व पिंपरी – चिंचवड शहरात लागू होणार आहे. रात्रीच्या वेळी 25 टक्के अतिरिक्त भाडे लागू असणार आहे. सुधरीत भाड्याचे सुसूत्रीकरण रिक्षा चालकांनी 15 आक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान करून घेणे बंधनकारक असल्याची माहिती आरटटीओ अधिकार्यांनी दिली.
