अफगाणिस्तानला वर्ल्ड कपमध्ये एन्ट्री

काबूल: ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये २०१५ साली होणा-या क्रिकेटच्या विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ पात्र ठरला आहे. वर्ल्ड कपमध्ये एन्ट्री मिळवणारा अफगाणिस्तान हा पाचवा आशियाई देश ठरला आहे.
आगामी विश्वचषकात अफगाणिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बांगलादेश, इंग्लंड, श्रीलंका आणि तिस-या क्वालिफायर टीमसह ‘ब’ गटात खेळेल. क्वालीफायर सामन्यात अफगाणिस्तानने केनियाचा पराभव केला.

आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग चॅम्पियनशिपमध्ये अफगाणिस्तानने केनियाला हरवून दुसरे स्थान मिळवले. शारजामध्ये झालेल्या वर्ल्ड क्रिकेट लीगच्या सामन्यात अफगाणिस्तानने केनियाचा सात विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात अफगाणिस्तानने केनियाला ४३ षटके आणि ३ चेंडूंमध्ये ९३ धावांवर रोखलं. अफगाणिस्तानने विजयासाठी आवश्यक लक्ष्य २० षटके आणि पाच चेंडूंमध्येच गाठले.

या विजयामुळे अफगाणिस्तानच्या खात्यात १९ गुण जमा झाले आहेत. आयसीसी वर्ल्ड लीगमध्ये त्यांनी आयर्लंडपाठोपाठ दुसरे स्थान मिळवले. जुलैमध्ये झालेल्या स्पर्धेतून आयर्लंडचा संघ विश्वचषकासाठी पात्र ठरला होता.त्यामुळेच वर्ल्ड लीगमध्ये दुस-या स्थानावरच्या अफगाणिस्तानला २०१५ सालच्या विश्वचषकासाठी पात्र ठरता आले आहे. विश्वचषकात अफगाणिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बांगलादेश, इंग्लंड, श्रीलंका आणि तिस-या क्वालिफायर टीमसह ‘ब’ गटात खेळेल.