पुण्यात रेडियो कॅब सुरु करण्याची मागणी

पुणे, – पुणे व पिंपरी – चिंचवड शहराची लोकसंख्या 50 लाखाच्या पुढे गेली आहे. लोकसंख्येच्या मानाने शहरात सार्वजनिक वाह्तुकीची साधने कमी आहेत. यामुळे शहरात मुंबईच्या धर्तीवर रेडीओ कॅबला परवानगी देण्यात यावी अशी मागणी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे (आरटीए) माजी सदस्य बाबा शिंदे यांनी आरटीएचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्या कडे केली आहे.

शहरात 2008 साला पासून काही खासगी ट्रॅव्हल कंपन्या रेडीओ कॅब सेवा पुरवत आहेत मात्र या कॅबना टप्पा वाहतुकीचा परवाना नाही त्यांच्याकडे ऑल इंडिया परमिट आहे यामुळे शहरात वाहतुक करण्यास या कॅबना प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी ( आरटीओ) बंदी घातली आहे. मोटर वाहन कायदा 1989 नुसार टप्पा वाहतुकीस कॅबला परवानगी नसल्याने या कॅबला लावण्यात आलेले मिटर आणि ते आकारत असलेले भाडे बेकायदेशिर ठरते. आरटीओने केलेल्या कारवाई मुळे शहरातील सुमारे बाराशे कॅब सध्या बंद आहेत.

या विषयी बोलताना शिंदे म्हणाले, शहरात 2008 सालापासून बेकायदेशिर पद्धतीने रेडीओ कॅब सूरू आहेत. आरटीओ यावर कोणतीही कारवाई करत नव्हते मागील महिन्यात परिवहन सचिवांनी दिलेल्या आदेशानुसार आरटीओ सध्या रेडेओ कॅबवर कारवाई करत आहे, मात्र शहरातील लोकांची आवश्यकता लक्षात घेऊन आरटीओने मोटार वाहन कायदा 1989, 66 अ मध्ये दुरूस्ती करून शहरात रेडिओ कॅबला टप्पा वाहतुक करण्यास परवानगी द्यावी जेणेकरून पुणेकरांना उत्तम वाहतुकीचा एक चांगला पर्याय उपलब्ध होईल.