देशातले ७५ टक्के लोक उपाशी

नवी दिल्ली – देशातल्या गरीब लोकांची संख्या कमी होत असल्याचा सरकारचा दावा खोटा असून देशातील ७५ टक्के लोक उपाशी आहेत, असे मत उत्सा पटनायक या संशोधिकेने आपल्या प्रदीर्घ संशोधनाअंती मांडले आहे. सरकारने देशातली गरिबांची संख्या ३० टक्के असल्याचे म्हटले असले तरी त्यात काही तथ्य नाही. प्रत्यक्षात गरिबांची संख्या ७५ टक्के आहे असा पटनायक यांचा निष्कर्ष आहे.

उत्सा पटनायक यांनी देशातल्या लोकांच्या खाद्यान्नामध्ये समाविष्ट असलेल्या पोषण द्रव्यांच्या आधारावर गरिबीचे मोजमाप काढले असून त्यानुसार देशात ७५ टक्के लोकांना शरीराची जोपासना करण्यापुरते पोषक अन्न मिळत नाही, असे आढळले आहे. पटनायक या दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्राध्यापिका असून त्यांनी आपल्या संशोधनाचे निष्कर्ष इकॉनॉमिक ऍन्ड पोलिटिकल विकली या पाक्षिकात प्रसिद्ध केले आहेत.

२००४ पासून २०११ पर्यंत गरिबांच्या संख्येत वाढच झाली आहे आणि त्याचे कारण देशातली मुक्त अर्थव्यवस्था हेच आहे असे सांगतानाच श्रीमती पटनायक यांनी देशातला गरीब माणूस महागाईने पुरता पिळला गेला असल्याचे म्हटले आहे. जागतिक मंदीच्या परिणामाने सुद्धा गरीब माणसाची परवड झाली आहे असेही डॉ. पटनायक यांनी नमूद केले आहे.