आता सनीवर डॉक्युमेंट्री

पॉर्न चित्रपटांतून बॉलीवूडच्या मायानगरीत दाखल झालेली पॉर्न स्टार सनी लियॉनसाठी हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. विविध स्तरांतून तिच्यावर टीकेचा अक्षरश: भडीमार करण्यात आला होता, पण त्यामुळे डगमगून न जाता सनी आता मुख्य प्रवाहात आली आहे.

कामावरील आपल्या श्रद्धेमुळे हळूहळू ती आपल्या कारकीर्दीचा आलेख उंचावत आहे. सनीच्या आयुष्याला सुरुवातीचे दिवस, नंतर पॉर्न स्टार म्हणून कारकीर्द व आता बॉलीवूड असे नाट्यमय वळण मिळालेले आहे. तिचे हेच आयुष्य आता डॉक्युमेंट्रीद्वारे लोकांसमोर आणले जाणार आहे. छायाचित्रकार दिलीप मेहता सनीच्या जीवनावर ही डॉक्युमेंट्री बनवत आहे. दिलीपने बर्‍याच दिवसांपूर्व सनीला यासंबंधी विचारणा केली होती व तिनेही त्यास सहमती दर्शविली होती.

प्रख्यात निर्माती व दिलीपची बहीण दीपा मेहता या डॉक्युमेंट्रीची निर्मिती करत आहे. ही डॉक्युमेंट्री वेळेत पूर्ण होण्यासाठी दीपाने सनीला तिच्या प्रत्येक चित्रपटाचे चित्रण व मोकळा वेळ यासंबंधीची माहिती देण्यास सांगितले आहे. यादरम्यान ती कसे राहते, तिला काय-काय आवडते, फावल्या वेळात ती काय करते यांसोबतच तिचे मित्र व नातलगांचाही या डॉक्युमेंट्रीमध्ये समावेश केला जाईल. याशिवाय पॉर्न स्टार म्हणून असलेली कारकीर्द आणि नंतर बॉलिवूडमध्ये मिळविललेले स्थान हादेखील या डॉक्युमेंट्रीचा महत्त्वाचा हिस्सा असेल.

सनीच्या हातात सध्या टीना और लोलो, रागिनी एमएमएस आणि ज्ॉकपॉट हे चित्रपट आहेत. रागिनी..व ज्ॉकपॉटचे चित्रण जवळपास आटोपले असून टीना और लोलोला लवकरच सुरुवात होणार आहे. सनीवर तयार होत असलेल्या डॉक्युमेंट्रीबद्दल तिला बॉलीवूडमध्ये आणणार्‍या महेश भट्टनेही शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या मते, सनी अतिशय साहसी असून बॉलिवूडचा तिचा प्रवास प्रचंड रोमांचक आहे. सनीकडे सुडौल बांधा असून चित्रपटात ती त्याचा चांगल्याप्रकारे वापर करून घेते. डॉक्युमेंट्रीच्या निर्मात्याला याचा नक्कीच लाभ होईल.