मुंबई – मास्टर ब्लास्टार सचिन तेंडुलकरला २०० व्या कसोटी सामन्यानंतर निवृत्त होण्यासाठी ‘बीसीसीआय’ दबाव आणत असल्याचे वृत्त निराधार आहे. त्याच्या कारकीर्दीचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार सचिनला असून आम्ही त्याच्यावर बीसीसीआने कुठलाही दबाव आणलेला नाही, असा खुलासा शुक्रवारी बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा सचिनच्या निवृत्तीसाठी बीसीसीआय दबाव आणत असल्याची बातमी अफवाच ठरली आहे.
याबाबत अधिक बोलताना पटेल म्हणाले, ‘सचिन तेंडुलकर हा महान क्रिकेटपटू आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीबद्दलचा निर्णय घेण्याचा हक्क केवळ त्याला एकट्यालाच आहे. ‘बीसीसीआय’ही क्रिकेटच्या या देवदूताला निवृत्तीबद्दल विचारू शकत नाही. मीडियानेही सचिनबद्दल अशा अफवा पसरवून त्याची महानता कमी करू नये. सचिन आणि संघनिवड समितीतील पाच सदस्य याबाबत योग्य वेळी निर्णय घेतील. सचिन तेंडुलकरच्या कुठल्याही निर्णयाचे ‘बीसीसीआय’कडून स्वागतच होईल असेही संजय पटेल यांनी स्पष्ट केले.’
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नाथन कुल्टरही सचिनचा निस्सिम चाहता आहे. सचिनने सदैव क्रिकेट खेळत राहावे अशी भावनिक प्रतिक्रिया मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूने दिली. नाईल म्हणाला, सचिन तेंडुलकर युवा क्रिकेटपटूंना टिप्स देण्यासाठी नेहमी उत्सूक असतो. त्याच्याकडे न संपणारी अनुभवाची शिदोरी आहे. मी कुठे चेंडू टाकला तर फलंदाज अडचणीत येईल याबद्दलच्या टिप्सही सचिन मला देतो. तेंडुलकरसारख्या महान खेळाडूच्या संघासोबत खेळायला मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते, मात्र आज स्वप्न सत्यात उतरले यावर विश्वासच बसत नाही, असेही नाइलने सांगितले.