मान्सून आणखी आठवडाभर लांबणार

पुणे, : – सामान्यतः मान्सून सप्टेंबर अखेर पर्यंत सुरू असतो. मात्र सप्टेंबर महिना संपला तरी अजून आठवडाभर मान्सून राज्यात मुक्कामी असणार आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली. गेल्या 24 तासात कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयाच्या बहुतांश भागात मान्सूनच्या सरी कोसळल्या आहेत.

सध्या दक्षिण छत्तीसगड व लगतच्या भागावर कमीदाबाचे क्षेत्र आहे. तसेच महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा उत्तर भाग व दक्षिण किनारपट्टीच्या भागात हवेची चक‘ाकार स्थिती आहे. यामुळे मान्सून संपून ही पुढील आठवडाभर मान्सून स्थिती राहणार आहे. गेल्या 24 तासात नैऋत्य मोसमी पाऊस विदर्भात सर्किय होता. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात काही ठिकाणी मुसळधार नैऋत्य मोसमी पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र व कोकण-गोव्यातही तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला आहे.

पुढील 48 तास हीच परिस्थिती कायम राहणार असून विदर्भात मुसळधार पावसाची तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.