पिंपरी-चिंचवड – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर तळेगाव दाभाडे जवळ उर्से टोलनाक्यावर आज पहाटे दोनच्या सुमारास झालेल्या चार वाहनांच्या विचित्र अपघातात अल्टो मोटारीतील चारजण जागीच ठार झाले. इनोव्हा मोटार आणि ट्रकच्या मध्ये अल्टो मोटार चिरडल्याने अपघाताची भीषणता वाढली.
पुणे- मुंबई एक्स्प्रेस हायवेवरील अपघातात 4 ठार
अवजड वाहनांनी टोलनाक्यावरील लेनची शिस्त न पाळल्याने हा अपघात झाला. ही सर्व वाहने मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत होती. अपघातातील सर्व मृत हे पुण्याच्या कोथरूड भागातील रहिवासी आहेत अॅड. सतीश म्यॅन्युअल पोहरकर, राजेश आर. त्रिपाठी, राजेश गोविंद भालवणकर आणि अनिल वासुदेव चव्हाण अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
चौघेही जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत होते. जमिनीच्या एका व्यवहारासाठी ते चौघे मुंबईला गेले होते. तेथून परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोलनाक्यावर कार व हलक्या वाहनांसाठी असलेल्या लेनमध्ये अवजड वाहने घुसल्यामुळे हा अपघात झाला. या लेनमध्ये अचानक शिरलेल्या एका टेम्पोवर इनोव्हा कार धडकली. त्याच वेळी पाठीमागून वेगात आलेली अल्टो कार (चक12 – एएफयू 9691) इनोव्हावर आदळली आणि त्याच लेनमध्ये वेगात शिरलेला ट्रक (केए 27 ए 154) अल्टो मोटारीला धडकला. इनोव्हा आणि ट्रकमध्ये चिरडल्याने अल्टो मोटारीतील चौघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताचे वृत्त समजताच तळेगाव दाभाडे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. अपघातातील अल्टो मोटारीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. या मोटारीचे पत्रे कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
उर्से टोलनाक्यावर मुंबईहून पुण्याकडे जाताना बाहेर पडण्यासाठी सहा लेन आहेत. त्यात व्हीआयपी वाहने, कार व हलकी वाहने, टेम्पो, ट्रक व बस तसेच अतिअवजड वाहनांसाठी स्वतंत्र रांगा आहेत, मात्र त्याचे पालन होत नाहीत. रांगेत एक-दोन मिनिटही थांबण्याची वाहन चालकांची तयारी नसते. आपली वाहने पुढे दामटण्याच्या नादात लेनची शिस्त पाळली जात नाही. त्यामुळेच अशा पद्धतीचे अपघात होतात आणि त्यात निष्पाप लोकांचा बळी जातो. लेनची शिस्त पाळल्यास असे अपघात सहज टळू शकतात.
