पुणे- : सध्या घरगुती स्वरूपात ग्राहकांकडे असलेला सोन्याचा साठा अर्थव्यवस्थेत लवकर येणे आवश्यक असून त्यामुळे मागणी पुरवठ्याचे विस्कळीत झालेले गणित सुधारेल तसेच चालू खात्यावर वाढत असलेली तुट आटोक्यात राहण्यास मदत होईल अशी अपेक्षा वर्ल्ड गोल्ड कौन्सिल चे संचालक विपिन शर्मा यांनी आज येथे पत्रकाराशी बातचीत करताना व्यक्त केली.
कौन्सिलने अश्व ही विवाहातील सप्तपदी विधीशी जोडलेली दागिन्यांची मालिका आज बाजारपेठेत सादर केलि. अभिनेत्री जुही चावला यावेळी उपस्थित होती.
जून अखेर संपलेल्या तिमाहीत देशाची सोन्याची आयात ५ ६ ७ टन झाली, अशी माहिती देऊन शर्मा म्हणाले की २ ० १ २ च्या जून अखेर ती ३ ८ ३ टन होती यावरून मागणीचा जोर कायम असल्याचे स्पष्ट होते. केंद्राने चालू खात्यातील तूट कमी करण्यास सोन्यावरआकारले जाणारे आयात शुल्क वाढविले तरी मागणी कमी झाली नाही कारण एप्रिल – मे महिन्यात भावात झालेली मोठी घसरण हे आहे . घसरण झाल्याने त्यात वाढ झाली आणि मागणी पुरवठ्याचे गणित बिघडले. ते सुधारावे असे वाटत असेल तर सरकारने घरगुती सोने मुख्य प्रवाहात आणले पाहिजे .
सोने आणि दागिने वापराचे बदलते प्रवाह स्पष्ट करताना ते म्हणाले की गेल्या काही वर्षात अधिकाधिक तरुण ग्राहक सोन्याकडे वळतो आहे . केवळ लग्न-सण समारंभ नाही तर इतर वेळी सोन्याचा वापर वाढतो आहे. आता विशीतील युवती दागिने वापरू लागल्या आहेत . म्हणूनच जगातील सोन्याच्या खपापैकी ५ ५ टक्के भारत आणि चीन या देशात होतो.
नाणे विक्रीवर सरकारने निर्बंध घातले त्याबाबत विचारता ते म्हणाले की ग्राहकाला खरेदी करायची आहे त्यामुळे त्याला प्रतिबंध करणे उचित नाहि. दागिने घडविण्याच्या व्यवसाय रोजगार निर्मिती करणारा आहे आणि त्याच्या निर्यातीतून परकीय चलनही मिळते त्यामुळे सरकारने या दोन्हीचा समतोल साधणे गरजेचे आहे.
अमेरिकेत दागिन्यांना मागणी
गेल्या दोन तीन वर्षात अमेरिकेत दागिन्यांना असलेली मागणी वाढल्याचा नवा प्रवाह लक्षात येतो आहे अशी माहिती देऊन ते म्हणाले की नाजूक कलाकुसर केलेल्या दागिन्यांना अधिक मागणी आहे . जागतिक प्रवाहाच विचार करता सोन्याच्या उलाढालीचे केंद्र पूर्वेकडील देशातच आहे हेही लक्षात घायला हवे .