स्वप्न गांधीजींचे

महात्मा गांधी यांनी आपण दारूबंदीसाठी किती आग्रही आहोत असे सांगताना म्हटले होते, ‘‘मी हुकूमशहा झालेा आणि मला एक मिनिटभर या पदावर ठेवून एक आदेश काढण्याची परवानगी दिली तर मी दारूबंदी लागू करणारा आदेश जारी करीन.’’ आपण ज्यांना राष्ट्रपिता म्हणतो त्यांच्या मनातली दारूविषयीची घृणा आपण जाणलीच नाही. वाढते जीवनमान आणि आधुनिकता यांच्या नावाखाली आपण मद्याला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवत चाललो आहोत. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र शासनाने प्रसिध्द केलेल्या एका आकडेवारीमध्ये महाराष्ट्रात गेल्या १५ वर्षात मद्याच्या वापरात तिप्पट वाढ झाली असल्याचे म्हटले आहे. आपण अन्य कोणत्या क्षेत्रात प्रगती करो की न करो या क्षेत्रात मात्र छान प्रगती केलेली आहे. आता तर काय मुक्त अर्थव्यवस्थेने जीवनच व्यापून टाकलेले आहे. पैसा हे जीवनाचे सर्वस्व होत चाललेले आहे आणि चांगल्या जीवनाच्या कल्पना आपण गुंडाळून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षात दारू पिण्याचे प्रमाण अजून कैक पटींनी वाढले तरी आपल्याला नवल वाटायला नको.

सध्या आपल्या जीवनामध्ये रोजगार निर्मिती हा शब्द परवलीचा झाला आहे. मात्र ती रोजगार निर्मिती कशा प्रकारची झाली आहे आणि ती कशातून निर्माण झालेली आहे याचे आपल्याला काहीच गम्य नाही. पैसा वाढविणे, पैसा निर्माण करणे आणि राहणीमानात कथित वाढ करणे याचे आपल्याला वेडच लागलेले आहे. पण त्या राहणीमानाचा दर्जा काय, त्या राहणीत मूल्यांचे स्थान काय, ते राहणीमान वाढवताना आणि जोपासताना आपण कशा कशाचा बळी देत आहोत याची कसलीच तमा आपण बाळगेनासे झालो आहोत. माणसाच्या जीवनाची बरबादी करणार्‍या गोष्टी आपण उभ्या करत आहोत आणि त्यातून रोजगार निर्मिती करत आहोत. हा चुकीचा मार्ग आहे याची तर आपल्याला काही खंतच नाही. रोजगार निर्मिती व्हावी यासाठी चक्क देशी दारूची दुकाने आपण उघडत आहोत. रोजगार निर्मिती करून लोकांचे कल्याण करायचे आणि तिच्यासाठी लोकांचे जीवन बरबाद करणारी दारू वाढवत जायची असा हा उफराटा कल्याणकारी कार्यक्रम जारी आहे.

सरकारी अधिकार्‍यांना या उफराट्या कारभाराचा चांगलाच अनुभव येत असतो. महात्मा गांधी हे आपले राष्ट्रपिता असल्यामुळे त्यांच्या जयंती दिवशी दारूबंदीचा प्रचार करणारे कार्यक्रम आयोजित करावे लागतात. गावागावातून दारूबंदीसाठी प्रयत्न करणार्‍या कार्यकर्त्यांचे सत्कार आयोजित करावे लागतात. मात्र दुसर्‍या बाजूला असे अधिकारी आपल्या कार्यालयात पोचतात तेव्हा सरकारकडून आलेला फॅक्स संदेश त्यांची वाट पहात असतो. त्या संदेशामध्ये राज्याच्या अबकारी कर खात्याकडून त्यांना एक विचारणा करण्यात आलेली असते. दरवर्षी काही ठराविक प्रमाणात देशी दारूची दुकाने वाढवावीत असे उद्दिष्ट त्यांना नेमून दिलेले असते आणि या उद्दिष्टांची पूर्तता कितपत झाली आहे याची विचारणा करणारा हा संदेश असतो. देशी दारूच्या दुकानात त्यांना वाढ करावीच लागते कारण ती दुकाने वाढली तरच राज्याच्या अबकारी करात भरीव वाढ होणार असते. किंबहुना बहुतेक राज्य सरकारांच्या उत्पन्नाच्या साधनांमध्ये दारूपासून मिळणार्‍या अबकारी कराचा वाटा सिंहाचा राहत आलेला आहे. तेव्हा अशा प्रकारची विचारणा करणारा फॅक्स संदेश घेण्यासाठी हे अधिकारी आपल्या कार्यालयात जातात तेव्हा आसनाच्या वरच्या बाजूला भिंतीवर महात्मा गांधींची तसबीर लावलेली असते.

महात्मा गांधींच्या तसबीरीमध्ये गांधीचे ते मिश्किल आणि बालसुलभ हास्य सर्वांचे लक्ष वेधून घेते. शासकीय अधिकारी गांधीजींचा फोटो लावून त्यांच्या तत्वांशी विसंगत अशी धोरणे राबवतात. तेव्हा महात्मा गांधी त्यांच्याकडे बघून मिश्किलपणे हसत असतात. एखादा अधिकारी संवेदनशील असेल तर तो महात्मा गांधींच्या या तसबीरीशी मनातल्या मनात संवादही साधत असेल. तो म्हणत असेल, ‘‘बापूजी, तुम्ही ज्या दरिद्री माणसाचे नेते म्हणून उभे राहिलात त्या दरिद्री माणसाला दोन वेळचे जेवण सुखाने मिळवायचे असेल सरकारने त्याला मदत केली पाहिजे की नाही? मग ती मदत करायची असेल तर सरकारचे उत्पन्न वाढले पाहिजे की नाही? देशी दारूची दुकाने वाढली नाहीत तर उत्पन्न वाढणार कसे? तेव्हा तुम्ही आमच्याकडे बघून असे मिश्किलपणे हसू नका.’’ खरे आहे या अधिकार्‍याचे म्हणणे. गरीब माणसाला मदत करण्यासाठी, गरीब माणसाला उद्ध्वस्त करणार्‍या दारूला प्रोत्साहन देऊनच पैसा गोळा करण्याची ही युक्ती महात्मा गांधींना कशी सुचली असती.

Leave a Comment