सीपीआयचे प्रकाश करात यांनी घेतली मुलायमसिहांची भेट

नवी दिल्ली – काँग्रेसच्या कोअर कमिटीने दोषी लोकप्रतिनिधींना वाचविणारा वटहुकूम मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सीपीआय (एम)चे सरचिटणीस प्रकाश करात यांनी बुधवारी सकाळी समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांची भेट घेतली.

सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही नेत्यांमध्ये वादग्रस्त अध्यादेशामुळे निर्माण झालेल्या राजकीय स्थितीवर चर्चा झाली. मात्र सीपीआय (एम)च्या सूत्रांनी अशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. धर्मनिरपेक्षता अधिक बळकट करण्यासाठी आयोजित करण्यात येणा-या राष्ट्रीय अधिवेशनाच्या रणनितीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सीपीआय(एम)च्या सूत्रांनी सांगितले.

येत्या 30 ऑक्टोंबरला धर्मनिरपेक्ष शक्तींचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात धर्मांध शक्तींचा सामना करण्यासाठी संयुक्त कार्यक्रम ठरवण्यात येणार आहे. उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगर आणि इतर भागांमध्ये झालेल्या जातीय दंगलींच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. गेल्या काही आठवडयांमध्ये करात आणि यादव यांच्यामध्ये झालेली ही दुसरी बैठक आहे.

Leave a Comment